Voice of Eastern

मुंबई : 

एमबीबीएसचे साडेचार वर्षांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्याही महाविद्यालय किंवा संस्थेमध्ये एका वर्षाची इंटर्नशिप करता येत होती, मात्र यापुढे या विद्यार्थ्यांना त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेल्या संस्थेमध्येच इंटर्नशिप करावी लागणार आहे. यासंदर्भातील आदेश राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून (एनएमसी) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला (एमयूएचएस) दिले आहेत. या निर्णयामुळे ग्रामीण भागामधील संस्थांमध्ये रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा मिळण्याबरोबरच प्रॅक्टिस चुकवणार्‍या विद्यार्थ्यांना चाप बसणार आहे.

राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालये व संस्थांमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना एक वर्ष इंटर्नशिप करणे बंधनकारक आहे, मात्र ही इंटर्नशिप राज्यातील कोणत्याही वैद्यकीय शिक्षण संस्थेत करण्याची विद्यार्थ्यांना मुभा होती. त्यामुळे ग्रामीण भागातील वैद्यकीय महाविद्यालये व संस्थांची शिक्षणासाठी निवड केलेले अनेक विद्यार्थी शहरातील आपल्या घराशेजारील महाविद्यालयांची इंटर्नशिपसाठी निवड करतात, तर सरकारी महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण असल्याने कामाचा ताण कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक ग्रामीण भागातील किंवा स्थानिक रुग्णालयामध्ये इंटर्नशिपला प्राधान्य देतात. जेणेकरून नीट-पीजीच्या परीक्षेची तयारी करणे शक्य होईल. विद्यार्थ्यांकडून अवलंबण्यात येणार्‍या या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी तसेच ज्या वैद्यकीय महाविद्यालयात किंवा संस्थेत विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले, त्याच भागातील नागरिकांना आरोग्याच्या उत्तम सेवा मिळाव्यात यासाठी एनएमसीकडून नवीन धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार या वर्षापासून विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण घेतलेल्या महाविद्यालयामध्येच इंटर्नशिप करावी लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये यावर्षी एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षामध्ये ६७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नव्या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांची परीक्षा झाल्यावर त्यांना एनएमसीचा नवा निर्णय लागू होणार आहे.

शहरी भागातील अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यावर इंटर्नशिपसाठी स्वत:च्या घराजवळील संस्थेची निवड करतात. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये अनेकदा डॉक्टरांचा तुटवडा जाणवतो, मात्र या निर्णयामुळे ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये डॉक्टर उपलब्ध होऊन नागरिकांना आरोग्यसेवेच्या चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होईल, असे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले.

इंटर्नशिपमध्ये रक्ताचे नमुने घेणे, कॅथेटर बसवणे याबरोबरच आरोग्य चाचण्यांचे बारकावे शिकावे लागतात. त्यामुळे अन्य रुग्णालयांमध्ये इंटर्नशिपसाठी गेल्यास त्यांना या बाबी शिकण्यामध्ये अडचणी येतात. त्यामुळे स्वत:च्याच महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात इंटर्नशिप केल्यास त्यांना उत्तम प्रशिक्षण मिळण्यास मदत होईल. एनएमसीच्या नव्या नियमामुळे वैद्यकीय शिक्षणात गुणवत्ता वाढीस मदत होणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे अतिरिक्त संचालक प्रा. आशुतोष सायना यांनी सांगितले.

Related posts

अक्षय तृतियाच्या मुहूर्तावर सिद्धीविनायक मंदिरात दागिन्यांचा लिलाव

Voice of Eastern

बारावी परीक्षेच्या आदल्या रात्री १२ वाजेपर्यंत ९३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले

नववर्षात पहिल्या आठवड्यात थंडीला सुरुवात होणार

Leave a Comment