मुंबई :
एका राज्यातून दुसर्या राज्यात वाहतूक करणार्या वाहनांना महाराष्ट्र सरकारने सोमवारपासून वाहनांच्या नंबरप्लेटसाठी बीएच(भारत) ही नवी मालिका सुरू केल्याची घोषणा केली. या नव्या मालिकेमुळे वाहनांना सहजरित्या आंतरराज्य वाहतूक करणे शक्य होणार आहे, असा विश्वास वाहतूक, गृह आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात बीएच ही मालिका सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिक त्यांच्या नव्या गाडीने एका राज्यातून दुसर्या राज्यात सहज प्रवास करु शकतील. आम्ही दिलेल्या वचनाला अनुसरुन महाराष्ट्रात बीएच मालिकेची नोंदणी सुरू झाली आहे. दिवाळीपूर्वी तुम्ही तुमच्या नव्या गाडीची डिलीव्हरी स्वीकारु शकता आणि सहजरित्या एका राज्यातून दुसर्या राज्यात दीर्घ प्रवास करु शकतात, असे पाटील यांनी सांगितले. नवीन मालिकेसाठी मोड्युल तयार होते आणि त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या. राज्यात ही नवीन मालिका सुरू करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आणि तो आमच्यासाठी प्राधान्यक्रम होता. हे मोड्युल अतिशय योग्य पध्दतीने सुरू असून त्याची अंमलबजावणी सुरू होताच काही दिवसात सरकार बीएच मालिकेची नोंदणी सुरू करणार असल्याचे सतेज पाटील यांनी १८ ऑक्टोबरला केलेल्या घोषणेत म्हटले होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि वाहतूक मंत्री अनिल परब यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.
डिजीटल पद्धतीने होणार नोंदणी
आतापर्यंत मोटर वाहन कायदा १९८८ नुसार एका राज्यात नोंदणी केलेली गाडी दुसर्या राज्यात बारा महिन्यांपेक्षा अधिक काळ ठेवल्यास नव्याने नोंदणी करावी लागत होती. परंतु बीएच मालिकेमुळे ही किचकट प्रक्रिया आता रद्द झाली आहे. तसेच नवीन नोंदणी पध्दत डिजीटल पध्दतीने होणार आहे.
हे पण वाचा : सावधान! ही आहेत मानखुर्द, गोवंडीमधील बेकायदा नर्सिंग होम