Voice of Eastern

मुंबई : 

आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामाला शनिवारपासून (२६ मार्च) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होत असून गतविजेता चेन्नई सुपर किंग्जसमोर गत उपविजेता कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान आहे. चेन्नईचे नेतृत्व अष्टपैलू रवींद्र जडेजा भूषवत आहे तर कोलकात्याची धुरा श्रेयस अय्यरकडे आहे. दोन्ही संघांचा नवा कर्णधार पाहता सलामीच्या लढतीची उत्सुकता वाढली आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दोन दिवस आधी महेंद्रसिंग धोनीने कॅप्टन्सी सोडली. चेन्नई फ्रँचायझीने जडेजाकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली. फारच कमी कालावधीत कर्णधारपदाची धुरा आल्याने वैयक्तिक कामगिरी उंचावण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर आहे.

दोन्ही नव्या कर्णधारांना आपापल्या संघांतील प्रमुख क्रिकेटपटूंविना खेळावे लागणार आहे. चेन्नईचा मध्यमगती गोलंदाज दीपक चहर दुखापतग्रस्त आहे. अष्टपैलू मोईन अली भारतात आला तरी क्वारंटाइन व्हावे लागणार असल्याने ओपनिंग सामन्यात तो खेळू शकणार नाही. कोलकात्यातही सर्वकाही आलबेल नाही. अलेक्स हेल्सची अनुपस्थिती त्यांना जाणवेल. त्याची रिप्लेसमेंट असलेला आरोन फिंच हा राष्ट्रीय कर्तव्यामुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. मोइनच्या गैरहजेरीत पहिल्या सामन्यात चेन्नई संघ डेवॉन कॉन्व्हे याला आयपीएल पदार्पणाची संधी देऊ शकतो. तो ऋतुराज गायकवाडसह डावाची सुरुवात करू शकतो. विवाहबंधनात अडकल्याने वेगवान गोलंदाज टिम साउदी उशिराने आयपीएलच्या बायो-बबलमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे शनिवारच्या लढतीत कोलकाताच्या अंतिम संघात श्रीलंकेचा गोलंदाज चमिका करुणारत्नेच्या समावेशाची शक्यता आहे. श्रेयसमोर भारताचा आणखी एक वेगवान गोलंदाज खेळवण्याचा ऑप्शनही आहे.

चेन्नईची बॅटिंगची भिस्त गायकवाड, कॉन्व्हेसह अनुभवी रॉबिन उथप्पा, अंबती रायुडू, कर्णधार जडेजा, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तसेच ड्वायेन ब्राव्होवर आहे. गतविजेत्यांची गोलंदाजी थोडी कमकुवत वाटते. ख्रिस जॉर्डनसह अॅडम मिल्ने, ब्राव्हो तसेच जडेजावर त्यांची बॉलिंगची मदार आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील नाईट रायडर्सना फलंदाजीत कॅप्टन अय्यरसह वेंकटेश अय्यर, अनुभवी अजिंक्य रहाणे, नितीश राणा, सॅम बिलिंग्ज, आंद्रे रसेल आणि अष्टपैलू सुनील नरिनकडून खूप अपेक्षा आहेत. कोलकात्याकडे प्रभावी गोलंदाजही आहेत. त्यात रसेल आणि नरिनसह शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

Related posts

संरक्षण दल नव्हे, सशस्त्र सैन्य दल म्हणा : माजी एअर मार्शल भूषण गोखले

Voice of Eastern

अतिरिक्त शिक्षकांना बीएलओ (BLO) ड्युटीऐवजी रात्रशाळेत शिकवू द्या

संगीत विभागात प्रवेश पण राहण्याची सोय नाही; विद्यार्थी हतबल

Leave a Comment