Voice of Eastern

मुंबई :

मुंबईतील एक ऐतिहासिक मैदान असेलल्या ‘बॉम्बे जिमखान्या’वर भारतातील पहिला कसोटी क्रिकेट सामना १५ ते १९ डिसेबर १९३३ रोजी खेळवला गेला होता. या ऐतिहासिक घटनेला ८८ वर्षे झाली असून त्याचा उत्सव बॉम्बे जिमखान्यातर्फे यंदा साजरा केला जात आहेत. या जिमखान्याच्या मातीचे पूजन आणि तिचे संवर्धन करत या मैदानाला अभिवादन करण्यासाठी १५ डिसेंबरला विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला भारताचे माजी क्रिकेट कर्णधार दिलीप वेंगसरकर, माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री, बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी, बॉम्बे जिमखानाचे अध्यक्ष श्री आगा हुसेन हे मान्यवर उपस्थित होते.‘स्पोर्ट्स मार्केटिंग गुरु’ शैलेंद्र सिंग आणि आगामी ‘८३’ या चित्रपटात वेंगसरकर यांची भूमिका साकारणारे अभिनेता आदिनाथ कोठारे हे मान्यवर उपस्थित होते.

भारतात पहिला क्रिकेट कसोटी सामना हा १५ ते १९ डिसेंबर १९३३ दरम्यान बॉम्बे जिमखाना येथे खेळविला गेला होता. या सामन्यातील पहिला चेंडू मोरीस निकोलस यांनी टाकला होता. पाच दिवस चाललेल्या हा सामना पाहण्यासाठी तब्बल ५० हजार लोक आल्याची नोंद आहे. प्रख्यात क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांनी त्यांचे पहिले शतक याच सामन्यात केले होते. त्यांच्यावर फिदा होवून प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेल्या कित्येक महिलांनी त्यांचे दागिने अमरनाथ यांच्यावर उधळल्याची नोंद इतिहासात आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून हा सामना पाहण्यसाठी क्रिकेटप्रेमी या मैदानावर आले होते. दुर्दैवाने हा सामना भारताने गमावला होता.

दिलीप वेंगसरकर म्हणाले, बॉम्बे जिमखान्याचे हे मैदान मुंबईतील सर्वोत्तम अशा मैदानांपैकी एक आहे. ते क्रिकेटचे दिवस इथे फिरून आले पाहिजेत. माझ्या आवडत्या मैदानांपैकी हे एक मैदान आहे. मला आठवते मन्सूर आली खान पतौडी यांच्या विरोधात एक सामना खेळत असताना श्याम सावंत या गोलंदाजाला त्याने पायाजवळ चेंडू टाकायल सांगितले. पण पतौडी यांनी तो अगदी कौशल्याने मिड ऑनला टोलवला. आमची फजिती झाली. मी इथे बरेच महाविद्यालयीन सामने खेळलो आहे. हजारो प्रेक्षक त्यावेळीही सामना पाहायला येत असत.

रवी शास्त्री म्हणाले, या कार्यक्रमाचे आयोजन बॉम्बे जिमखान्याने केले याचा मला अतिशय आनंद आहे. भारतात जी पहिला कसोटी सामना खेळवला गेला त्याचा आज ८८ व वर्धापनदिन आहे. असे कार्यक्रम आयोजित करणे खूप गरजेचे आहे कारण लोक आपले सुवर्ण क्षण सुद्धा लवकर विसरतात. या सुवर्ण क्षणांसाठी बॉम्बे जिमखाना क्रिकेटप्रेमींच्या नेहमीच लक्षात राहील. हा पहिला सामना इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. मला पूर्ण आशा आहे की बॉम्बे जिमखान्याचे सुवर्ण दिवस पुन्हा उलटून येतील. या सामन्यात लाल अमरनाथ यांनी शतक तर ठोकले, पण ब्रिटीश आणि भारतीय यांची बसण्याची सोय वेगळी असल्याने ते साजरे करण्यासाठी क्लब हाऊसमध्ये जाता आले नाही. त्यामुळे मग प्रेक्षकांमधून लालाजींवर सोन्याच्या दागिन्यांचा वर्षाव झाला. मला या मैदानावर खेळायला नेहमीच आवडले आहे. त्याचे पहिले कारण म्हणजे येथील पीच खूपच सुंदर आहे. त्याला चागला बाउंस आहे त्यामुळे खेळायला खूप मजा येते. दुसरे म्हणजे इथले जेवण. ते इतके सकस असते की खाल्ल्यावर तुम्हाला झोप येत नाही आणि सामना आरामात खेळता येतो, असेही रवी शास्त्री यांनी सांगितले.

बॉम्बे जिमखान्याचे अध्यक्ष आगा हुसेन यावेळी बोलताना म्हणाले, सर्व भारतीय आणि क्रिकेटप्रेमींच्या वतीने बॉम्बे जिमखानाने या ऐतिहासिक अशा सुवर्णक्षणाचा उत्सव करण्याचे ठरवले आहे. भारतीय क्रिकेट इतिहासातील ते सुवर्णक्षण आहेत. यंदापासून दरवर्षी हा वर्धापनदिन साजरा केला जाणार आहे. १८५७ साली स्थापना झालेल्या बॉम्बे जिमखान्याला या आयोजनाचा विशेष अभिमान आहे.

Related posts

भारतीय सैन्यदल व महाराष्ट्रातील गिर्यारोहकांनी ५० गडकोटांवर फडकवला तिरंगा

उद्योगांनी कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केल्यास सरकार सर्वतोपरी मदत करणार – मंगल प्रभात लोढा

BE FAST हेच मी माझ्यासोबत घेऊन जाईन- अशोक सराफ 

Leave a Comment