मुंबई :
पायाच्या सांध्यामध्ये वर्षभरापासून दुखत असल्याने चालणे मुश्किल झाले होते. मात्र हे कशामुळे दुखत आहे, याचे निदान अनेक डॉक्टरांना करता येत नव्हते. त्यामुळे हे दुखणे वाढून सविताला (नाव बदललेले आहे) (वय ३८) चालणे मुश्किल झाले होते. मात्र या महिलेच्या रोगाचे निदान करत तिच्यावर जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. यामुळे वर्षभरापासून चालणे मुश्किल झालेली ही महिला शस्त्रक्रियेनंतर अवघ्या काही तासांतच पुन्हा चालू लागली आहे.
पंढरपूर येथील रहिवासी असलेल्या सविताच्या पायाच्या सांध्यामध्ये मागील वर्षभरापासून सतत दुखत होते. हे दुखणे दिवसेंदिवस वाढू लागले. त्यामुळे तिला चालणेही अवघड झाले होते. त्यामुळे तिने पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील अनेक डॉक्टरांकडे उपचारासाठी गेली. मात्र अनेक डॉक्टरांना तिला नेमका कशामुळे त्रास होत आहे याचे निदान करता येत नव्हते. त्यामुळे तिचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला होता. त्यातच ही महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याने त्याचा परिणाम तिच्या दुखण्यावर होऊन त्रास अधिकच वाढू लागला होता. अशातच पंढरपूरमधील एका डॉक्टरने तिला मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला.
सविता जवळपास महिनाभरापूर्वी आपल्या मुलीसोबत जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी आली. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिला चालताना डाव्या नितंबामध्ये त्रास होत होता. मात्र नितंबामध्ये तिथे कोणतीही जखमी झाल्याचे किंवा सूज आल्याचे लक्षण नव्हते. मात्र तरीही तिच्या नितंबामध्ये प्रचंड वेदना होत होत्या. या वेदनांमुळे तिला चालणे शक्य होत नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी एक्स रे व अन्य काही चाचण्या केल्या. यामध्ये या महिलेच्या नितंबामधील हाडांचा सांधा खराब झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नितंबामधील हाडाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय जे.जे. रुग्णालयाच्या अस्थिव्यंगशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. नादिर शाह यांनी घेतला. त्यानुसार तिला ३० ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. ती दाखल झाल्यानंतर काही चाचण्या केल्यानंतर जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नादिर शाह यांनी सवितावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यासाठी येणारा खर्च पेलविणे शक्य नव्हते. त्यामुळे जे.जे. रुग्णालाचे वैद्यकीय अधीक्षक संजय सुरासे आणि डॉ. रेवत कानिंदे यांनी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून तिच्यावर उपचार मोफत करण्यासाठी प्रयत्न केले.