Voice of Eastern

मुंबई : 

नोकरीमध्ये कायम करावे, वेतनवाढ, हक्काच्या सुट्ट्या मिळाव्यात सुट्ट्या मिळाव्या अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील १९ वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक जे.जे. रुग्णालयात साखळी उपोषणाला बसले आहेत. मात्र त्यांच्याकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने अखेर शुक्रवारी उपोषणाच्या पाचव्या दिवशी हतबल झालेल्या प्राध्यापकांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रतिकात्मक झुणका-भाकर आंदोलन केले.

जे.जे. रुग्णालयासह राज्यातील १९ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये २०० पेक्षा अधिक डॉक्टर सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. हे प्राध्यापक हा ते सात वर्षांपासून अस्थायी पद्धतीने काम करत आहेत. त्यांना प्रत्येकवेळी सरकारकडून कायम करण्याबाबत आश्वासन दिले जात आहे. मात्र ठोस कोणतीही कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे अनेकदा शिक्षकांना आपली पुढील ऑर्डर निघेल का? याची भीती असते. अनेकदा नोकरीच्या तणावाखाली काम करत असलेल्या या डॉक्टरांचा त्यांच्या कामावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अशाही परिस्थितीमध्ये हे डॉक्टर आपले काम चोखपणे बजावत आहेत. इतकेच नव्हेतर कोरोना परिस्थितीमध्येही त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत समर्थपणे रुग्णसेवा बजावली. त्यामुळे सरकारकडून त्यांचा कोरोना योद्धा असा गौरवही करण्यात आला. मात्र कोरोना योद्धांना सेवेत कायम करण्याकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने अखेर निराश झालेल्या डॉक्टरांनी साखळी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिलेल्या आश्वासनानंतरही सेवा नियमित करण्यासंदर्भातील मागणी लालफितीत अडकलेली आहे. त्यामुळे सलग पाच दिवस उपोषण करूनही दुर्लक्ष करत असलेल्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि मंत्रिमंडळाने तात्काळ निर्णय घेऊन कोरोना योद्ध्यांचा सन्मान करावा यासाठी २१ जानेवारीला दुपारी डॉक्टरांनी गरीबांचा आहार असलेले ‘झुणका-भाकर’ आंदोलन केले. आंदोलनामध्ये १९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रत्येकी दोन प्रतिनिधी, तसेच जे. जे. रुग्णालयातील सर्व प्राध्यापक आणि वरिष्ठ प्राध्यापक सामील झाले होते, अशी माहिती डॉ. अमित लोमटे यांनी दिली.

सेवा कायम व्हावी, वेतनवाढ, सुट्ट्या मिळाव्या या मागण्यांसाठी आम्ही पाच दिवसांपासून आंदोलन करत आहोत. पण सरकारकडून कोणतीही दखल घेतलेली नाही. डॉक्टरांची होत असलेली आबाळ यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रतिकात्मक झुणका भाकर आंदोलन करण्यात आले. आंदोलनात १९ वैद्यकीय महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापकांनी झुणका-भाकर आंदोलनात सहभागी झाले आहेत.
– डॉ सचिन मुलकुटकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना, जे. जे. रुग्णालय

Related posts

जिल्हा अजिंक्यपद खो खो स्पर्धा : मुलींमध्ये ओम साईश्वर सेवा मंडळला तर कुमारांमध्ये विद्यार्थी क्रीडा केंद्राला अजिंक्यपद

लालबागच्या राजाचे ७ कोटी भाविकांनी घेतले ऑनलाईन दर्शन

Voice of Eastern

पॉलिटेक्निकच्या थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशाची नोंदणी सुरू

Leave a Comment