मुंबई :
आयएनएस कुंजालीच्या एमसी-एटी-आर्म्स II मध्ये कार्यरत भारतीय नौदलाचे वरिष्ठ नौसैनिक मदन राय यांची कन्या जिया राय हिने २० मार्च २०२२ रोजी पाल्कच्या सामुद्रधुनीतील श्रीलंकेतील तलाईमन्नार ते धनुषकोडी असे २९ किलोमीटरचे अंतर १३ तास १० मिनिटात पूर्ण करून भारतासाठी अत्यंत गौरवास्पद कामगिरी केली आहे.
मुंबईच्या नौदल विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या जिया हिला ऑटीझम स्पेक्ट्रम हा आजार आहे. तिने वयाच्या १३ वर्ष आणि १० महिने इतक्या कमी वयात हा पराक्रम गाजविल्यामुळे ती पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार करणारी सर्वात कमी वयाची आणि सर्वात वेगवान महिला जलतरणपटू ठरली आहे. याआधी हा विक्रम कुमारी बुला चौधरी हिच्या नावे होता. तिने २००४ मध्ये ही सामुद्रधुनी पार करण्यासाठी १३ तास ५२ मिनिटांची वेळ नोंदविली होती. भारतीय जलतरण महासंघ, तामिळनाडूचे क्रीडा विकास प्राधिकरण आणि ऑटीझम सोसायटी ऑफ इंडिया यांच्यासह अनेक संस्थांच्या संयुक्त सहकार्याने भारतीय पॅरा जलतरण महासंघाने जिया राय हिच्या जलतरणाचा हा उपक्रम राबविला. गोवा शिपयार्ड मर्यादित या कंपनीने या कार्यक्रमाचे आर्थिक प्रायोजकत्व स्वीकारले होते. जिया हिच्या पोहोण्याच्या कालावधीत श्रीलंकेच्या अखत्यारीतील क्षेत्रात शोध तसेच मदत कार्याची जबाबदारी श्रीलंकेच्या नौदलाकडे होती, भारतीय क्षेत्रात हे काम भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाने केले.
परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, एडीसी, फ्लॅग ऑफिसर, पश्चिमी नौदल कमांडचे कमांडिंग-इन-चीफ व्हॉईस अडमिरल अजेन्द्र बहादूर सिंग यांनी या अभूतपूर्व कामगिरीबद्दल जिया राय आणि तिच्या पालकांचे अभिनंदन केले. जिया राय हिने वर्ष २०२२ साठीच्या प्रतिष्ठित पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कार मिळविले आहेत. जगातील सर्व महासागरांमध्ये पोहोण्याचे ध्येय तिने निश्चित केले आहे.