मुंबई:
गिर्यारोहक जितेंद्र गवारे यांनी माउंट मनास्लू या ८१६३ मीटर उंच व जगातील आठव्या उंच शिखरावर २८ सप्टेंबरला यशस्वी चढाई करत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. या आधी गवारे यांनी एप्रिलमध्ये माउंट अन्नपूर्णा-१ या जगातील दहाव्या उंच शिखरावर तर मे महिन्यात माउंट एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखरावर यशस्वी चढाई केली होती. जेष्ठ गिर्यारोहक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते उमेश झिरपे यांचे मार्गदर्शन गवारे यांना लाभले.
नेपाळमधील गोरखा भागामध्ये स्थित असलेले ‘माउंट मनास्लु’ या शिखराची उंची ८१६३ मीटर असून उंचीनुसार या शिखराचा जगामध्ये आठवा क्रमांक लागतो. तसेच मनास्लु हा पर्वत उर्जेचे स्त्रोत व स्फूर्तीदायक पर्वत म्हणून ओळखला जातो. याचे मनास्लु हे नाव संस्कृत भाषेतून आले असून याचा अर्थ ‘बुद्धीजीवी’ असा होतो. या शिखराच्या वाटेवर मोठमोठ्या पर्वतकडांचा व हिमनद्यांचा समावेश आहे. हे सर्व अडथळे पार करून शिखरमाथ्यावर पोहोचल्यानंतर आसपास उभे असलेले साडेसहा हजार मीटरहून उंच असलेले १० हून अधिक शिखरे तर ७ हजार मीटरहून उंच असलेली काही शिखरे नजरेस पडतात. येथून जवळच ‘अन्नपूर्णा’ नावाचे आणखी एक अष्टहजारी शिखर असून त्याचे विहंगम दृश्य ‘मनास्लु’वरून नजरेस पडते. याच शिखरावर गवारे यांनी एप्रिलमध्ये यशस्वी चढाई केली होती. तसेच तिबेटची सीमा देखील या शिखरमाथ्यापासून अगदी जवळ आहे. जितेंद्रच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हे पण वाचा- भारतीय गिर्यारोहण इतिहासातील सुवर्णक्षण
हिमालयातील शिखरांवर तिरंगा फडकवण्याचे उद्दिष्ट्य
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात हिमालयातील विविध शिखरांवर यशस्वी चढाई करून भारतीय तिरंगा फडकविण्याचे उद्दिष्ट्य आहे. या आधी लेह-लडाख मधील कांग यात्से १ व २ या शिखरांवर, गढवाल हिमालयातील माउंट मंदा-१ शिखरावर गिरिप्रेमीच्या यशस्वी मोहिमा संपन्न झाल्या, जितेंद्रच्या या यशाने नेपाळमधील माउंट मनास्लु शिखरावर देखील भारतीय तिरंगा डौलाने फडकला, असे जेष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी सांगितले.
सहा महिन्यांत तीन अष्टहजारी शिखर सर
सहा महिन्यात माउंट अन्नपूर्णा-१, माउंट एव्हरेस्टसह माउंट मनास्लू या तीन अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई करण्याचा विक्रम केला
जितेंद्र हा तयारीचा गिर्यारोहक असून, त्याची मानसिक व शारीरिक तंदरुस्ती वाखाणण्याजोगी आहे. सहा महिन्याच्या आत तीन अष्टहजारी शिखर चढाई करण्याची क्षमता त्यात होती व त्याला यात यश आले, याचा आम्हाला आनंद आहे.
– उमेश झिरपे, जेष्ठ गिर्यारोहक