Voice of Eastern

कुपवाड (जि. सांगली) :

सांगली येथे झालेल्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत किशोर-किशोरी गटातील सामन्यांचा थरार सांगलीकर क्रिडाप्रेमींनी अनुभवला. त्यामध्ये यजमान सांगलीच्या संघानी दुहेरी विजेतेपदाला गवसणी घातली. किशोरी गटात धाराशिव तर किशोर गटात ठाणे उपविजयी ठरले. पुरूष व महिला गटात पुण्याने दुहेरी विजेतेपद मान पटकावला तर महिलांमध्ये धाराशिव आणि पुरूषांमध्ये मुंबई उपनगरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या मान्यतेने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, सांगली जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या माध्यमातून कुपवाड येथील अकूज ड्रीमलेंड (ता. मिरज जि. सांगली) येथे कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई पाटील, भाजप नेते शेखर इनामदार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, नगरसेवक गजानन मगदूम, भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डाॅ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव अॅड. गोविंद शर्मा, क्रीडा विभागाचे उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, सांगली जिल्हा खो -खो असोसिएशनचे अध्यक्ष समीर शेख, सचिव प्रशांत इनामदार यांच्यासह अन्य मान्यवर पारितोषिक वितरणाला उपस्थित होते.

किशोर-किशोरी गटातील सामन्यांचा थरार

अंतिम सामन्यांचा थरार पाहण्यासाठी हजारो सांगलीकर उपस्थित होते. त्यांची अपेक्षाही किशोर-किशोरी गटातील खेळाडूंनी पूर्ण केली. किशोरींच्या अंतिम सामन्यात यजमान सांगलीने धाराशिवचा (२५-२२) ३ गुणांनी पराभव करत स्पर्धेतील विजेतेपद पटकावले. आरंभीला दोन्ही संघांचे गुण (१५-१५) समान झाल्यामुळे जादा डाव खेळवण्यात आला. या डावातील आक्रमणात सांगलीने १० गुण मिळवले. धाराशिवला आक्रमणात ७ गुणच मिळवता आले. त्यामुळे या सामन्यात सांगली संघ विजयी ठरला. सांगलीकडून वैष्णवी चाफे हिने (१ मि., १.२० मि. संरक्षण व ७ गुण), सुवर्णा तामखडे (१.३०, २, २ मि. संरक्षण व २ गुण), पायल तामखडे (१, १. मि. संरक्षण व ७ गुण) असा खेळ करत विजयात सिंहाचा वाटा उचलला. तर धाराशिवकडून मैथिली पवार (१.२०, २.३० मि., १.२० मि. संरक्षण व ७ गुण), मुग्धा वीर (१.१० संरक्षण व ६ गुण), सिद्धी भोसले (१.५० मि. संरक्षण व ३ गुण) यांनी चांगला खेळ करत सामन्यात रंगत आणली.

किशोर गटात सांगलीने ठाण्याचा लघुत्तम आक्रमणापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात पराभव करच कै. भाई नेरूरकर राज्यस्तरीय स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. जादा डावात समान गुण झाल्यामुळे लघुत्तम आक्रमणाचा डाव खेळवण्यात आला. त्यामध्ये सांगलीने विजय मिळवला. चुरशीच्या सामन्यात सांगलीकडून रितेश भालदार (१.३०,१.५० व १ मि. संरक्षण व ४ गुण), संग्राम डोबळे (२, १, ३ मि. संरक्षण), श्री दळवी (१, २.२० व १.३० संरक्षण व ३ गुण) असा खेळ केला. ठाण्याकडून खेळताना ओंकार सावंत (२,,२, २.२० मि संरक्षण व ३ गुण), अमन गुप्ता (३.४०, २.३०, २ मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला.

पुरुष – महिला गटात चागला खेळ

महिला गटात पुण्याने धाराशिवला (११-१०) ४.१० मिनिटे राखून १ गुणांने मात केली. पुण्याकडून प्रियांका इंगळे (२.४०, २.१० मि. संरक्षण व ४ गुण), कोमल धारवाडकर (२, १ मि. संरक्षण), काजल भोर (१.३० व नाबाद १ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी पुण्याच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. धाराशिवकडून सुहानी धोत्रे (४ गुण), अश्विनी शिंदे (२, ३ मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला.

पुरूष गटात अंतिम सामन्यात पुण्याने मुंबई उपनगरवर (२०-१०) १० गुणांनी सहज मात केली. या विजयात पुण्याकडून खेळताना आदित्य गणपुले (२.३०, १.१० मि. संरक्षण व ५ गुण), शुभम थोरात (२.४० मि. संरक्षण), सुयश गरगटे (२, १ मि. संरक्षण व २ गुण) यांनी मोलाची कामगिरी केली. मुंबई उपनगरकडून अनिकेत चेंदणकर (१.५०, १, १.४० मि. संरक्षण व १ गुण), ऋषिकेश मुरचावडे (१.३०, १.४० मि. संरक्षण व १ गुण) यांनी चांगला खेळ केला.

वैयक्तिक पारितोषिक

पुरूष-महिला गट

  • सर्वोत्कृष्ट अष्टपैलू : आदित्य गणपुळे (पुणे), प्रियांका इंगळे (पुणे)
  • सर्वोत्कृष्ट संरक्षक : अनिकेत चेंदवणकर (मुंबई उपनगर), कोमल धारवटकर (पुणे)
  • सर्वोत्कृष्ट आक्रमक : रुद्र थोपटे (पुणे), सुहानी धोत्रे (धाराशिव)

किशोर-किशोरी गट

  • सर्वोत्कृष्ट अष्टपैलू : श्री दळवी (सांगली), वैष्णवी चाफे (सांगली)
  • सर्वोत्कृष्ट संरक्षक : विनायक भाणगे (ठाणे), श्रावणी तामखडे (सांगली)
  • सर्वोत्कृष्ट आक्रमक : रितेश बिरादार (सांगली), मैथली पवार (धाराशिव)

कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेतील किशोर-किशोरी गटातील अंतिम सामने चुरशीचे झाले. खेळाडूंनी दाखवलेले कौशल्य पाहता महाराष्ट्राचे भवितव्य उज्ज्वल आहे. चांगले खेळाडू तयार होतील हे या स्पर्धेत पहायला मिळाले. सांगलीतील प्रेक्षकांनाही दर्जेदार खेळ पाहता आला.

– ॲड. गोविंद शर्मा, सचिव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन

महाराष्ट्र शासनाने या स्पर्धेतील सहभागासाठी निधी वाढवून दिल्यामुळे आयोजन चांगल्या प्रकारे करता आले. खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळत आहेत. त्यामुळे खेळाडू दर्जेदार खेळ मैदानावर दाखवत आहेत.
– डॉ. चंद्रजित जाधव, सहसचिव, भारतीय खो-खो महासंघ

Related posts

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांतील जखमींना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार मदत 

DSCA CUP : प्रकाश जैस्वालची अष्टपैलू कामगिरी

उपस्थितीची सक्ती करणार्‍या महाविद्यालयांवर कारवाईची मागणी

Voice of Eastern

Leave a Comment