मुंबई :
मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील विद्यानगरी संकुलाचा कायापालट होणार आहे. हे संकुल पर्यावरणस्नेही बनवण्यात येणार असून, संकुलातील इमारतींवर सौर उर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच संकुलात कचरा विघटन प्रक्रियेचेही नियोजन प्रशासनाने केले आहे. यामुळे लवरकचरच कलिना विद्यानगरी पर्यावरणस्नेही झाल्याचे पाहायला मिळणार आहे.
मुंबई विद्यापीठाचे कलिना संकुल उर्जासक्षम करण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करण्यात येणार आहेत, याबाबत मुंबई विद्यापीठाला अधिसभा सदस्य डॉ. अनुजा पळसुलेदेसाई यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना विद्यापीठाने ही माहिती दिली आहे. विद्यापीठाच्या संकुलात वीज निर्मिती व्हावी या उद्देशाने सौर उर्जा पॅनल्स बसविण्यात येणार आहेत. यामध्ये संकुलातील क्रीडा संकुल, नॅनो टेक्नॉलॉजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, गरवारे जुनी आणि नवी इमारत, फिरोज शाह मेहता भवन आणि आयडॉल या इमारतींवर प्राथमिक स्वरुपात सौर पॅनल बसविले जाणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केलेे. याचबरोबर संकुलातील सर्वच इमारतींवर सौर उर्जा प्रकल्प सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. याबाबतचा अभ्यास करण्यासाठी सर्व इमारतींची वीज देयके ‘राज्य विद्युत नियमन आयोगा’कडे पाठविण्यात आली आहेत. यामुळे सध्या आयोगाच्या प्रस्तावाची प्रतीक्षा करत असल्याचेही विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कॅम्पसमध्ये कचरा विघटनाची प्रक्रियाही सुरू करण्यात येणार असल्याचे उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे. विघटनशील कचर्याचे बायोगॅस आणि खतामध्ये रुपांतर करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी महापालिकेचे अधिकारी सुभाष दळवी यांनी दिलेल्या पद्धतीचा स्वीकार करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. संकुलातील प्रयोगशाळांमधील कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी शास्त्रशुद्ध प्रक्रियेचा अवलंब करण्यात येणार आहे. तर कागदाच्या आणि प्लास्टिकच्या कचर्यासाठीही शास्त्रीय पद्धतीचा वापर करण्यात येणार असल्याचे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. ही सर्व प्रक्रिया सध्या सुरू असून लवकरच हे प्रत्यक्षात येईल असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.