Voice of Eastern

ठाणे :

नेरुळ जिमखान्याच्या अलिना मुल्लाने शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात नेगिव्ह क्रिकेट अकॅडमीच्या तुशी शहाचा अवघ्या एका धावेने पराभव करत मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यक्षेत्रात सुमारे २५ वर्षांनंतर प्रथमच रंगलेल्या पहिल्या खंडू रांगणेकर स्मृती महिला एकेरी विकेट क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

स्पोर्टिंग क्लब कमिटी आयोजित सेंट्रल मैदानावर खेळवण्यात आलेल्या स्पर्धेच्या निर्णायक लढतीत तुशीने एकदाही बाद न होता १२ चेंडूत १६ धावा केल्या. अलिनाने या आव्हानाला सामोरे जाताना दोन खणखणीत चौकरांसह एकदाही बाद न होता १७ धावा करत विजेतेपदाचे पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस आपल्या नावे केले. उपविजेत्या तुशीला तीन हजार रुपयांवर समाधान मानावे लागले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत अदिती सुर्वेने प्रज्ञा भगतवर दोन धावांनी विजय मिळवला. प्रज्ञाने चार चेंडूंच्या दोन षटकामध्ये आपली विकेट न गमावता १२ धावांचे लक्ष्य अदितीसमोर ठेवले. अदितीने आपली विकेट शाबूत राखत १४ धावा करत सामना जिंकला.

सर्वस्वी सुभाष, हरेश्वर आणि विवेक मोरेकर यांनी वडिल मोतीराम मोरेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिलेल्या सर्वोत्कृष्ठ क्षेत्ररक्षकाच्या पुरस्कारासाठी दहिसर स्पोर्ट्स क्लबच्या मुस्कान कनोजियाची निवड करण्यात आली. स्पर्धेत ३२ महिला क्रिकेटपटू सहभागी झाल्या होत्या.

उपांत्य फेरीचे निकाल : ( ४ चेंडूंचे एक षटक) : तुशी शहा – बिनबाद १९ विजयी विरुद्ध अदिती सुर्वे – १७ – २= १५ (एकदा बाद). अलिना मुल्ला – बिनबाद ८ विजयी विरुध्द अदिती सुर्वे – ६-२=४( एकदा बाद).

Related posts

मुंबई महानगरपालिका देणार थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांना गुणवत्तापूर्ण उपचार

व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर ‘अम्ब्रेला’चे पोस्टर प्रदर्शित

‘लालबागच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न

Voice of Eastern

Leave a Comment