Voice of Eastern

अहमदाबाद :

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष खोखो संघांनी उपांत्य फेरीत धडक मारून सुवर्णपदकाकडे आगेकूच केली आहे. उपांत्य सामने सोमवारी सकाळी नऊ वाजेपासून रंगणार आहेत. साखळी फेरीत अखेरच्या लढतीत महिला गटात महाराष्ट्राने पंजाबचा २४-१८ असा एक डाव आणि सहा गुणांनी पराभव करुन उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. महाराष्ट्राने गटात निविर्वाद वर्चस्व गाजवले. सलग तीन विजयासह महाराष्ट्र संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.

संपदा मोरेने २:२० मि. पळतीचा सुरेख खेळ केला. प्रियांका इंगळेची कामगिरी अष्टपैलू ठरली. प्रियांकाने १:३० मि. नाबाद पळतीचा खेळ केला आणि आठ गुण देखील संपादन केले. रुपाली बडेने ३ मिनीटे संरक्षण करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. दीपाली राठोडने २:२० मि. पळतीचा खेळ केला आणि आक्रमणात चार गुण देखील संघाला मिळवून दिले. शीतल भोरने सहा गुण मिळवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पंजाब संघाकडून सावेन व रमणदीप कौर यांनी झुंज दिली.

पुरुष गटात महाराष्ट्राने पश्चिम बंगालवर २२-८ एक डाव १४ गुणांनी विजय नोंदवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. साखळी सामन्यात महाराष्ट्राचा हा सलग तिसरा विजय ठरला. या दणदणीत विजयासह महाराष्ट्राने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. महाराष्ट्राच्या सर्वच खेळाडूंची कामगिरी लक्षवेधक ठरली. त्यात प्रामुख्याने ऋषिकेश मुर्चवडेने १:३० मि. संरक्षण केले. रामजी कश्यपने २:३० मि. पळतीचा खेळ केला व आक्रमणात दोन गुण मिळवून दिले. सुयश गरगटेने चार गुण घेत संघाची स्थिती अधिक भक्कम केली. अक्षय भांगरेने २ मि. संरक्षणाचा खेळ केला. मिलिंद कुरपेने आठ गुण घेऊन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. प्रतिक वाईकरने १:३० मि. संरक्षण व चार गुण मिळवत अष्टपैलू कामगिरी केली. लक्ष्मण गवसने १:३० मि. पळतीचा खेळ केला व २ गुण देखील मिळवले. एकूणच महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सामन्यावर आपले वर्चस्व कायम ठेवत बंगालला पराभूत करुन सुवर्णपदकाकडे आगेकूच केली आहे. बंगालकडून सुभाष (२ गुण) व मुर्तजा (१:२० मि. संरक्षण व २ गुण) यांचा अपवाद वगळता अन्य खेळाडू छाप पाडू शकले नाहीत.

महाराष्ट्राच्या महिला व पुरुष खोखो संघांनी उपांत्य फेरी गाठल्याने प्रशिक्षक, संघ व्यवस्थापकांनी आनंद व्यक्त केला आहे. संघाचे प्रशिक्षक शिरीन गोडबोले, कमलाकर कोळी, प्रवीण बागल आणि महाराष्ट्र खोखो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी संघाच्या दणदणीत विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना सुवर्ण पदक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. उद्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राचा संघ पुरुषांमध्ये कर्नाटक विरुध्द तर महिलांमध्ये दिल्ली विरुध्द लढत देणार आहे. तर पुरुषांचा दुसरा सामना केरळ वि. प. बंगाल व महिलांमध्ये कर्नाटक वि. ओडिशा असा रंगणार आहे. आज झालेल्या इतर सामन्यात महिलांच्या सामन्यात कर्नाटकने हरियाणाचा २२-२० (१२-०८) असा २:३० मि. राखून २ गुणांनी पराभव केला. पुरुषांमध्ये आंध्र प्रदेश व तामिळनाडू हा सामना २८-२८ असा बरोबरीत सुटला.

Related posts

‘विक्रम वेधा’चे मनोरंजक पोस्टर प्रदर्शित

गर्भपातप्रकरणी महाडमधील डॉक्टरला अटक

लवकर निदान…लवकर उपचार… राज्यात आजपासून कुष्ठ, क्षय रुग्ण शोध मोहीम

Leave a Comment