मुंबई :
अपघातामध्ये गुडघा खराब झाल्यास, गुडघा व पाय यामधील रक्तवाहिन्या खराब झाल्या असतील, पायाच्या दोन्ही हाडांना जोडणारा अस्थिबंध कमकुवत किंवा खराब झाला असल्यास किंवा वेदनादायी सांधेदुखी असेल अशावेळी गुडघा प्रत्यारोपण करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. मात्र राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणकडून (एनपीपीए) गुडघा बदलण्याच्या प्रणालीसाठी आवश्यक असलेल्या कृत्रिम सांध्याच्या किंमतीमध्ये १० टक्क्यांनी वाढ करण्यास मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया महागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मांडीचे हाड व पायाचे हाड यांना जोडणारा अस्थिबंध खराब झाल्यास नागरिकांना चालणे मुश्किल होऊन जाते. अस्थिबंध खराब झालेल्या असल्याने डॉक्टर कृत्रिम सांधा बसविण्याचा सल्ला देतात. त्यानुसार गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येते. गुडघा प्रत्यारोपणामध्ये गुडघ्याचा वेदनादायक सांधा काढून त्या जागी कृत्रिम सांधा बसविण्यात येतो. गुडघा प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेमध्ये मांडीच्या हाडाचे किंवा खालच्या पायाच्या हाडाचे टोक बाहेर काढले जाते. त्या जागेवर कृत्रिम सांधा लावण्यात येतो. काही दिवसांपासून कृत्रिम सांध्याचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून त्याची किंमत वाढविण्यासंदर्भात एनपीपीएकडे विनंती करण्यात येत होती. त्यानुसार एनपीपीएने कृत्रिम सांध्याच्य प्रत्यारोपणाबाबत विविध मते मागवून निरिक्षण केले आहे. त्यानुसार कृत्रिम सांध्याच्या किंमतीमध्ये पुढील वर्षभरासाठी १० टक्क्यांनी वाढ करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. १६ सप्टेंबर २०२३ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीसाठी ही वाढ लागू असेल किंवा पुढील सूचना जोपर्यंत लागू करण्यात येत नाही. तोपर्यंत ही वाढ लागू असेल, असे एनपीपीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गुडघा रोपणासाठी आवश्यक असलेल्या कृत्रिम सांध्याची किंमत ही साधारणपणे ३५ ते ४५ हजारांपर्यंत असते. मात्र एनपीपीएने दिलेल्या निर्णयामुळे यापुढे या सांध्याच्या किंमतीमध्ये १० टक्क्यांनी वाढ होईल. त्यामुळे गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या खर्चामध्ये साधारणपणे वाढ होण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.