मुंबई :
वयोवृद्ध नागरिकांना त्रास होत असतो यामध्ये काहीवेळा गुडघा प्रत्यारोपण देखील करावा लागतो मात्र ही सुविधा गरीब रुग्णांना जेजे, नायर, शीव, केईएम रुग्णालयांमध्ये असल्यामुळे पूर्व उपनगरातील नागरिकांना या ठिकाणी जावे लागत होते. मात्र पूर्व उपनगरातील साठी एक खुशखबर आहे की गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी पालिकेने गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात गुडघा प्रत्यारोपण सुविधा सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी एका महिलेवर येथील डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया देखील केली असून या सुविधेमुळे पूर्व उपनगरातील रहिवाशांना यापुढे इतर रुग्णालयात धाव घेण्याची गरज लागणार नाही.
गरीब रुग्णांना फायदा
महानगरपालिकेचे राजावाडी रुग्णालयात नंतर पूर्व उपनगरांमध्ये गोवंडीचे शताब्दी रुग्णालय हे सर्वात मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयात गोवंडी-शिवाजी नगर, मानखुर्द, देवनार, ट्रॉम्बे आणि चेंबूर परिसरातील मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे या रुग्णालयात नेहमीच रुग्णांची मोठी गर्दी असते. मात्र गुडघे आणि इतर मोठ्या हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी गरीब रुग्णांना जेजे, नायर, शीव, केईएम अथवा खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत होती. मात्र काही दिवसांपूर्वी शताब्दी रुग्णालयात देखील अशा मोठ्या शस्त्रक्रियेची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
महात्मा जोतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया
प्रामुख्याने गुडघा दुखीने त्रस्त असलेल्या रूग्णांसाठी याठिकाणी गुडघा प्रत्यारोपण ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी ठाणे परिसरात राहणाऱ्या जिजाबाई पवार ( वय ६५) यांच्यावर शताब्दी रुग्णालयातील डॉक्टर वीरेंद्र अग्रवाल आणि कस्तुब सावंत यांनी याठिकाणी गुडघा प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. अनेक वर्षांपासून त्यांना गुडघा दुखीचा मोठा त्रास होता. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना अनेक वर्षे उपचार करता आले नाही. मात्र शताब्दी रुग्णालयात देखील गुडघा प्रत्यारोपणाची सुविधा सुरू झाल्याचे त्यांना समजताच त्यांनी येथील डॉक्टरांनी भेट घेतली. त्यानुसार त्यांच्यावर महात्मा जोतिबा फुले योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.