मुंबई :
रत्नागिरी, रायगडमधील प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली दिवा पॅसेंजर या गाडीची लेट पॅसेंजर ही नवी ओळख आता निर्माण झाली आहे. मागील दोन महिन्यांत ही गाडी फक्त सहा वेळाच वेळेवर धावली आहे. त्यामुळे गावाहून मुंबईकडे येणार्या नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
कोकणातून मुंबईला येण्यासाठी असलेली रत्नागिरी-दिवा पॅसेंजर सकाळी लवकर सुटत असल्याने रायगड, रत्नागिरीमधील अनेक प्रवासी या गाडीने प्रवास करण्याला पसंती देतात. ही गाडी दुपारी १.३० वाजेपर्यंत दिवा येथे पोहोचत असल्याने नागरिकांना दुपारच्या पाळीला कामावर जाणे शक्य होत असते. रत्नागिरीहून सकाळी साडेपाच वाजता सुटणारी ही पॅसेंजर दुपारी १.३० वाजेपर्यंत पोहोचणे अपेक्षित असते. परंतु रत्नागिरीहून वेळेवर सुटूनही ही पॅसेंजर सलग दोन महिने सातत्याने विलंबाने दिवा स्थानकात पोहोचत आहे. १५ जानेवारी ते १५ मार्च या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये ही गाडी १७ जानेवारी, १९ जानेवारी, ३ फेब्रुवारी, १८ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी आणि २७ फेब्रुवारी या सहा दिवशीच नियोजित वेळेवर पोहोचली आहे, अशी माहिती रेल्वे प्रवासी अक्षय महापदी यांना रेल्वेचे सीनियर डीएम रवींद्र वंजारी यांनी माहिती अधिकारात दिली आहे.
रेल्वेच्या नियमानुसार निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे गाडी उशिरा पोहोचल्यास ती गाडी वेळेवर असल्याचे समजले जाते. त्यामुळे या सहा दिवसांमधील काही दिवस ही गाडी १५ मिनिटांपर्यंत उशिरा आलेली आहे. परिणामी ही गाडी दोन महिन्यांमध्ये फारच कमी वेळा वेळेवर पोहोचलेली आहे. गाडी विलंबाने दिवा स्थानकात पोहोचत असल्यामुळे रत्नागिरी व रायगडमधून मुंबईत येणार्या प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले आहे यातील अनेक प्रवासी हे दुपारच्या ड्युटीला कामावर जाण्याच्या अनुषंगाने गावातून निघालेले असतात, मात्र गाडी वेळेवर पोहोचत नसल्याने त्यांना कामावर जाणे शक्य होत नाही.
रत्नागिरी-दिवा पॅसेंजरला रोहा, नागोठणे, कासु आणि पेण येथे थांबे दिले आहेत. त्या दिवसापासून ही गाडी दिवा स्थानकात पोहचण्यास २ ते २.३० वाजत असल्याचे अक्षय महापदी यांनी सांगितले.