मुंबई :
कोरोना व ओमायक्रोनच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात मुंबईसह ठाणे, नवी मुंबई व इतर भागात १ ली ते ९ वी व ११ वीचे वर्ग बंद करून ऑनलाईन शिक्षण देण्याचे आदेश काढले आहेत. शिक्षकांना मात्र विनाकारण शाळेत बोलावण्यात येत असून त्यांनाही वर्क फ्रॉम होम करू द्यावे अशी मागणी शिक्षक संघटनेकडून करण्यात आली आहे.
देशात वाढत्या कोरोनाच्या संक्रमणामुळे केंद्र शासनाच्या कार्यालयात ५० टक्के उपस्थिती केली आहे. मुंबईतील वाढती संख्या पाहता १० वी १२ वी वगळता इतर वर्गाचे ऑनलाईन शिक्षण देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तथापि १ ली ते ९ वी व ११ वीच्या शिक्षकांना दररोज शाळेत बोलावले जात आहे. ऑनलाईन शिक्षण घरुनही होत असल्याने उगीच शिक्षकांना बोलावणे गैर आहे. त्यामुळे विनाकारण लोकलमध्ये गर्दी होते व कोरोना संक्रमणाचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे १० वी व १२ वी वगळता इतर वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करू द्यावे अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे. याबाबत अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त व शिक्षण सचिवांकडे पत्राद्वारे निवेदन दिले आहे.