Voice of Eastern

होळी सण म्हणजे छोट्या मंडळींचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला असतो. पिचकारीची खरेदी असो किंवा वेगवेगळे रंग व पाण्याचे फुगे साठवणे असो किंवा गोड मिठायांवर ताव मारणे असो, गल्लोगल्ली सणाची धामधुम अगदी रंगात आली आहे. सगळ्यांनाच घराबाहेर पडायचे आहे आणि उत्सवाचा आनंद लुटायचा आहे हे खरेच आहे मात्र होळी खेळणाऱ्या प्रत्येकाला हा आनंद सुरक्षितपणे व मनमुराद घेता यावा यासाठी काही बाबतीत खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लहान मुलांसाठी तर अशी सावधगिरी बाळगणे अधिकच आवश्यक आहे. मास्कचा वापर अत्यावश्यक आहे हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही.

  • कोणाशीही विशेषत: अनोळखी व्यक्तींशी हात मिळवणे, मिठी मारणे टाळा.
  • घरगुती/स्वत: बनविलेले रंग वापरा कारण बाजारात उपलब्ध रंग हे विषारी आणि हानीकारक असू शकतात.
  • घराबाहेर काही खाणे, पेयपान टाळा कारण ते दूषित असू शकते व त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते.
  • काहीही खाण्या/पिण्यापूर्वी हात धुवा – आपल्या मुलांनीही हे करावे याची काळजी घ्या.
  • आजारांविरोधात प्रतिकारशक्ती असणे अतिशय गरजेचे आहे, तेव्हा गोडाधोडावर तुटून पडतानाही संतुलित आहार घेण्याकडे लक्ष द्या. फळे, भाज्या, दूध आणि हळद हे काही पर्याय तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या वाढविण्यास मदत करतील.

आवर्जून कराव्यात अशा गोष्टी:

  • जेव्हा तुम्ही होळी खेळण्यासाठी बाहेर जाल तेव्हा स्वत:साठी आणि मुलांसाठी विशेषत: आपले डोळे, त्वचा आणि केसांची सुरक्षा जपणारी काही संरक्षणात्मक साधने आवर्जून वापरा. त्वचेवर तेल किंवा पेट्रोलियम जेली लावा म्हणजे त्वचा आणि रंग यांच्यामध्ये एक संरक्षक थर तयार होईल व नंतर ते रंग सहज धुवून काढता येतील. आपल्या मुलांच्या डोळ्यांचा रंगांपासून बचाव करण्यासाठी त्यांना स्विमिंग गॉगल्स घालायला सांगा, तसेच पूर्ण बाह्यांचे कपड घातल्यास त्वचेला आणखी संरक्षण मिळेल.
  • मुले एकदा खेळायला घराबाहेर गेली की त्यांना वेळेचे भान उरत नाही. पण सध्या बाहेरचे वातावरण अतिशय उष्ण आहे त्यामुळे शरीराला कोरड पडण्याचा धोका नेहमीच असतो. त्यामुळे मुलांनी भरपूर पाणी प्यावे याची काळजी घ्या. डिहायड्रेशन हा खरोखरीच एक मोठा धोका आहे आणि मुलांना हीटस्ट्रोक किंवा उन्हाच्या तलखीमुळे येणारा थकवा जाणवू नये यासाठी आवश्यक ती पावले उचला.
  • होळी खेळण्यात भरपूर वेळ घालवावासा वाटणे स्वाभाविक आहे, पण खूप काळ रंगात आणि पाण्यात भिजणे धोकादायक ठरू शकते. यामुळे मुलांना सर्दी आणि ताप येऊ शकतो, तेव्हा मर्यादित वेळेतच होळी खेळा म्हणजे त्याचे तब्येतीवर नकारात्मक परिणाम होणार नाही.
  • आपल्या मुलांना सौम्यपणे आणि सभ्यपणे होळी खेळायला शिकवा. त्यांना कुणालाही होळी खेळण्यासाठी बळजोरी करता कामा नये, कुणावर जोरजोरात फुग्यांचा मारा करता कामा नये किंवा कुणाच्या चेह-यावर, डोळ्यांत किंवा कानांत पिचकारीचे पाणी उडवता कामा नये. त्यांनी एकमेकांना इजा करू नये यासाठी त्यांना फुग्यांऐवजी पिचकारी वापरण्यास प्रोत्साहन द्या. फुगे वापरायचे असतीलच ते इतर मुलांवर थेट मारले जाणार नाहीत याची काळजी घ्या.
  • आपत्कालीन प्रसंगी संपर्क साधता येईल अशा व्यक्तींची यादी जवळ ठेवा, यात मुलांचे डॉक्टर, अ‍ॅम्ब्युलन्स आण जवळपासच्या हॉस्पिटल्सचा नंबर असला पाहिजे. तुमचे मूल आपल्या काही मित्रमंडळींसोबत होळी खेळत असेल तर त्या मित्रांच्या पालकांचेही नंबर तुमच्याकडे असले पाहिजेत.
  • मुलांना अनोळखी व्यक्तींपासून दूर रहायला सांगा आणि फक्त आपले कुटुंबिय व मित्रपरिवाराबरोबरच होळी खेळण्याचा सल्ला द्या. अनोळखी व्यक्तींचा धोका हा अजूनही संभवतो आणि विशेषत: सणासुदीच्या काळात तो अधिकच वाढतो.

वरील खबरदारी घेतल्याने तुम्ही व तुमचे कुटुंब सुरक्षितपणे व आनंदाने होळी साजरी करू शकाल! तेव्हा मौज करा, रंग, खाऊ आणि भरपूर आनंदाचे गाठोडे भरून ठेवा – फक्त आवश्यक ती काळजी घ्यायला विसरू नका म्हणजे हा सण सगळ्यांसाठीच चिरस्मरणीय आणि खूप आनंददायी ठरू शकेल.

लेखक – डॉ. अस्मिता महाजन, निओनॅटोलॉजिस्ट आणि पिडिएट्रिशियन, एस एल रहेजा हॉस्पिटल

Related posts

मॉडर्न नाईट हायस्कूल मुंबई सेंट्रल या रात्र शाळेत योग दिन साजरा

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवा २७ मार्चपासून होणार पूर्ववत

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ दीक्षांत समारंभ स्थगित

Leave a Comment