मुंबई :
गतवर्षी झालेल्या पावसामध्ये महाड तालुक्यातील खरकवाडी आणि दहिवड गावाला जोडणाऱ्या पुलाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे रात्री अपरात्री ये-जा करणाऱ्या नागरिकांचे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या पुलाची तातडीने डागडुजी व्हावी यासाठी खरकवाडी ग्रामस्थांनी आमदार भरत गोगावले यांची भेट घेऊन निवेदन दिले.
महाड तालुक्यातील श्री क्षेत्र खडकवाडी आणि दहिवड गावाच्या हद्दीजवळून वाहणाऱ्या काळ नदीवर असलेला पूल या दोन्ही गावांसाठी महत्त्वाचा आहे. हा पूल १९७५ मध्ये बांधण्यात आला होता. ४५ वर्ष जुना झालेला हा पूल खूप जीर्ण झालेला असून दरवर्षी पावसाळ्यात पुलावरुन पाणी जाते. त्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात नासधूस होते. यावर्षी पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे पुलाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुलावरील लोखंडी कठडे तुटले असून रात्री अपरात्री पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांचा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता पुलाची तातडीने डागडुजी व दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होऊन त्याची दुरुस्ती करण्यासाठी खरकवाडी ग्रामस्थांनी स्थानिक आमदार भरत गोगावले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी हनुमान सेवा ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अशोक कदम, विलास म्हामुणकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.