मुंबई
प्लास्टर ऑफ पॅरिस वर बंदी नंतर आता सामान्य गणेश भक्तांकडून शाडूच्या गणेश मूर्तींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. २०२१ साली भाद्रपद मध्ये मोठ्या प्रमाणात शाडू मातीच्या गणेश मूर्ती पाहायला मिळाले. दरवर्षी हा कौल आता वाढतच जाणार आहे. येत्या काही दिवसात आता माघी गणेशोत्वाला देखील सुरुवात होणार आहे. माघी गणेशोत्वात गणेश भक्तांकडून बाप्पाच्या मूर्तीची मागणी वाढत आहे. मात्र आता २०२२ ला येणाऱ्या माघी गणेशोत्सवासाठी बाप्पाच्या शाडूच्या मातीच्या १ फुटाच्या मूर्तीला किमान १० ते १२ हजार मोजावे लागणार असल्याने गणेश भक्तांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
भाद्रपदच्या गणेशोत्सवानंतर आता लाखो गणेश भक्तांना चाहूल लागणार आहे ती म्हणजे माघी मध्ये सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाची. पुढच्या वर्षी फेब्रुवारीच्या ४ ताऱखीला म्हणजेच गणेश जयंती साजरा होणार आहे. याच दिवशी बाप्पाचा माघी गणेशोत्वाला सुरुवात होणार आहे. मुंबईतील विविध माघी गणेशोत्सव मंडळ तसे अनेक गणेश भक्त आपल्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करत असतात.
एका बाजूला १ फुटाच्या मूर्तीला १० ते १२ हजार रुपये दर योग्य असल्याचे मत मूर्तिकार रेश्मा खातू यांनी व्यक्त केले.मूर्ती बनवताना जागेचं भाडं, वीज बिल तसेच खर्च देखील भरपूर असल्याचे मत मूर्तिकार प्रशांत देसाई यांनी व्यक्त केले. तर दुसऱ्या बाजूला आधीच कोरोनाच्या काळात सामान्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. अजून हि लोक यातून सावरायचं प्रयत्न सुरु आहेत. गणेश मूर्तीची किंमत नक्कीच आपण लावू शकत नाही. तसेच मूर्तिकाराच्या कलेचा आम्हाला नक्कीच आदर आहे. मात्र मूर्तिकारांनी देखील आमचा विचार करावा असे मत सामान्य गणेश भक्तांकडून व्यक्त होत आहे.