चेंबूर |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मंत्री छगन भुजबळ यांच्या वरती केस दाखल केल्यानंतर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे हे चर्चेत आले होते. यानंतर काही नाटकीय घडामोडी समोर आले आहेत. सुहास कांदे यांनी या केस संदर्भात दोन दिवसापूर्वी एक गंभीर बाब उघड केली होती. कांदे यांनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांच्या पुतण्याने मला धमकीचा फोन केला असा आरोप केला होता. हे आरोप अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचा पुतण्या आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (ए) युवा विंगचे प्रदेश अध्यक्ष अक्षय निकाळजे यांनी फेटाळून लावले आहेत.उलट खोट्या आरोपांबद्दल आमदार कांदे यांच्यावर मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा अक्षय यांनी दिला आहे.
काही दिवसापूर्वी छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामध्ये खडाजंगी उडाली होती. या घटनेचे अनेक व्हिडिओ देखील प्रसारित झाले होते. त्यानंतर आक्रमक झालेले कांदे यांनी नियोजन समितीचा निधी विकल्याबाबत छगन भुजबळांविरोधात दाखल केली होती. ही याचिका मागे घ्यावी म्हणून अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचे कांदे यांनी म्हटले होते. याबाबत त्यांनी पोलिस आयुक्तांना पत्रही दिले होते. या प्रकरणात आता नवीन कलाटणी मिळाली आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचा पुतण्या अक्षय निकाळजे यांनी आमदार कांदे यांचे सारे आरोप फेटाळून लावले आहेत.
मी फोन केला हे खरं आहे. नाशिक वरून परत येताना टोल नाक्यावर आमच्या कार्यकर्त्याना टोल नाक्यावरील कर्मचार्यांनी मारहाण केली होती. त्यासाठी त्यांना फोन केला होता.हा टोल नाका सुहास कांदे यांचे भाऊ चालवतात यासाठी फोन केला होता. मी फोनवर कुठलीही धमकी दिली नाही.मी कधीही मंत्री छगन भुजबळ यांना कधी भेटलो सुद्धा नाही. मी या आमदारांचीच तक्रार देणार आहे. तसेच मानहाणीचा दावा न्यायालयात करणार आहे. त्यांनी लोकप्रियतेसाठी हे केलं असा आरोपही अक्षय निकाळजे यांनी केला आहे. विनाकारण या प्रकरणी गोवण्याचा प्रयत्न होत आहे यावर न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करू ,तसेच मुख्यमंत्री, गृहमंत्री पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार देणार असल्याचे अक्षय यांनी सांगितले.