मुंबई :
लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आली. बंदला सकाळपासूनच चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
गजबजलेले रिक्षा आणि बस स्टॅन्ड रिकामे दिसत आहेत. तसेच मुंबईतील रस्ते आणि रेल्वे स्थानकांच्या परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. घाटकोपर, विद्याविहार, पवई, विक्रोळी, भांडुप, मुलुंडमधील सर्व बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत होता.
मुंबईची लाईफलाइन समजली जाणारी बेस्ट, रिक्षा या सेवा बंद असल्याने नागरिकांनी स्वतः ची दुचाकी घेऊन कामावर जाणे पसंत केले. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्यांच्या वाहनांची महामार्गांवर वर्दळ दिसून येत आहे. काही व्यापारी संघटनांनी बंदला विरोध केला असला तरी मुंबईमध्ये सर्व दुकाने बंद असल्याची दिसून आली.
दादर, अंधेरी, वांद्रे या नेहमी गजबजलेल्या परिसरांमधील रस्तेही ओस पडले आहेत. मुंबईत दररोज होणारी रस्ते वाहतूक आज देखील कायम आहे. पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांचे रोज प्रमाणे असून वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे.
महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यापाठोपाठ आता मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. उद्या दुकाने सुरुच राहतील. मात्र, आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. बंदमध्ये दुकानदारांना खेचू नका, असे आवाहन विरेन शाह यांनी मुंबई व्यापारी संघामार्फत केले आहे.