Voice of Eastern

मुंबई : 

केंद्र सरकारच्या २०२१-२२ आर्थिक पाहणी अहवालानुसार स्टार्टअप्स उभारण्यामध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. ११ हजार ३०८ मान्यताप्राप्त स्टार्टअप्ससह महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे. देशभरात २०२१-२२ आर्थिक वर्षात सुरु झालेल्या ४४ स्टार्टअप्स यूनिकॉर्नपैकी ११ यूनिकॉर्नस महाराष्ट्रातील आहेत.

यूनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी जिचे मूल्यांकन ७ हजार ५०० कोटी ते ७५ हजार कोटी रुपये आहे. देशातील ४४ पैकी ११ म्हणजे २५ टक्के यूनिकॉर्नस हे महाराष्ट्रातील आहेत. ही बाब राज्यासाठी अभिमानाची असून, कल्पक तरुणांची कामगिरी अभिमानास्पद असल्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक म्हणाले. नवाब मलिक यांच्यासह कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी स्टार्टअपमधील यशाबद्दल तरुणांचे अभिनंदन केले आहे.

देशात ६२ हजार मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत. त्यापैकी राज्यात ३२ हजार ६६२ इतके नोंदणीकृत स्टार्टअप असून, त्यातील ११ हजार ७०५ स्टार्टअपना मान्यता मिळालेली आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान ५ ते ७ स्टार्टअप आहेत. गडचिरोलीमध्ये ३० नोंदणीकृत आणि ९ मान्यताप्राप्त, नंदुरबारमध्ये ३२ नोंदणीकृत आणि ११ मान्यताप्राप्त, मुंबई महानगर प्रदेशात १४ हजार ७१० नोंदणीकृत तसेच ५ हजार ९३८ मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत. सिंधुदुर्गमध्ये ३६ नोंदणीकृत तर १४ मान्यताप्राप्त, औरंगाबादमध्ये ७७४ नोंदणीकृत तर २२० मान्यताप्राप्त तर पुण्यामध्ये ८ हजार ६०३ नोंदणीकृत तर ३ हजार ३७५ मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. राज्यातील तरुणांना नवीनवीन संकल्पना पुढे आणण्यासाठी सरकार तरुणांना सर्वतोपरी प्रोत्साहन देत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. नीती आयोगातर्फे जाहीर केलेल्या इनोव्हेशन इंडेक्स २०२० मध्येही महाराष्ट्राने द्वितीय क्रमांक पटकावला होता, अशी माहितीही नवाब मलिक यांनी दिली.

नाविन्यतेस पूरक, स्टार्टअप्सना पाठबळ पुरवणारे उपक्रम आणि योजनांद्वारे महाराष्ट्राला स्टार्टअप हब बनविण्यासाठी कौशल्य विकास विभाग व महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी प्रयत्नशील आहे. नाविन्यता सोसायटीच्या योजनांची व उपक्रमांची माहिती मिळवण्यासाठी www.msins.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही मंत्री नवाब मलिक यांनी केले.

Related posts

खेलो इंडियात महाराष्ट्राची आगेकूच; योग, सायकलिंगमध्ये सुवर्ण पदके

Voice of Eastern

व्यापाऱ्याला प्रदर्शन भोवले!

Voice of Eastern

२४ फेब्रुवारीला रिलीज होणार सामाजिक चित्रपट ‘मसुटा’

Voice of Eastern

Leave a Comment