नवी दिल्ली :
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामधे सहभागी झालेल्या चित्ररथामधून लोकप्रिय निवड श्रेणीतील सर्वोत्कृष्ट संचलन दल आणि सर्वोत्कृष्ट चित्ररथासाठी पहिल्यांदाच, मायजीओव्ही (MyGov) व्यासपीठाद्वारे सर्वसामान्यांना मतदानासाठी आमंत्रित केले होते. २५ ते ३० जानेवारीदरम्यान ऑनलाइन मतदान घेण्यात आले.
लोकप्रिय निवड श्रेणीमध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वोत्तम लोकप्रिय म्हणून महाराष्ट्राच्या चित्ररथाची निवड झाली. महाराष्ट्राचा चित्ररथ ‘महाराष्ट्रातील जैवविविधता आणि राज्य जैव-मानके’ संकल्पनेवर आधारित होता.
उत्तर प्रदेशाला (लोकप्रिय पसंती) द्वितीय क्रमांक मिळाला, तर ‘जम्मू आणि काश्मीरचा बदलणारा चेहरा मोहरा’ या विषयावरील जम्मू आणि काश्मीरच्या चित्ररथाने तिसरा क्रमांक पटकावला.
भारतीय हवाई दलाची संचलन तुकडी तिन्ही सेवांमध्ये सर्वोत्तम संचलन तुकडी म्हणून निवड झाली. केंद्रीय राखीव पोलीस दलाला (सीआरपीएफ) सीएपीएफ व इतर सहाय्यक दलांमध्ये सर्वोत्तम संचलन दल म्हणून मायजीओव्हीवर (MyGov) सर्वाधिक मते मिळाली.
लोकांच्या निवडीवर आधारित केंद्रीय मंत्रालयांमध्ये टपाल विभागाच्या चित्ररथाला सर्वोत्कृष्ट घोषित करण्यात आले. ‘भारतीय टपाल: 75 वर्षे @ संकल्प – महिला सक्षमीकरण’ ही चित्ररथाची संकल्पना होती.
उत्तर प्रदेशचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामधे सहभागी झालेल्या १२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये उत्तर प्रदेशच्या चित्ररथाची सर्वोत्कृष्ट म्हणून निवड झाली. उत्तर प्रदेशचा चित्ररथ ‘एक जिल्हा एक उत्पादन आणि काशी विश्वनाथ धाम’ या संकल्पवेवर आधारित होता. दुसरे स्थान कर्नाटकच्या ‘पारंपारिक हस्तकले’ वर आधारित चित्ररथाला मिळाले. तिसरे स्थान ‘मेघालयच्या राज्याची ५० वर्षे आणि महिलांच्या नेतृत्वाखालील सहकारी संस्था आणि बचगट यांना मानवंदना’ या विषयावरील चित्ररथासाठी मेघालयला मिळाले.
केंद्रीय मंत्रालये व विभागांच्या श्रेणीमध्ये शिक्षण मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा चित्ररथ संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आला. शिक्षण मंत्रालय आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या चित्ररथाची संकल्पना ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ होती, तर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा चित्ररथ ‘उडे देश का आम नागरिक’ या संकल्पनेवर आधारित होता.
‘सुभाष @125’ या संकल्पनेवर आधारित गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (सीपीडब्लूडी) आणि ‘वंदे भारतम’ नृत्य गटाची विशेष पारितोषिक श्रेणीसाठी निवड करण्यात आली आहे.
नौदलाच्या संचलन तुकडी सर्वोत्तम
प्रजासत्ताक दिन संचलन २०२२ मधील सर्वोत्कृष्ट चित्ररथ आणि सर्वोत्कृष्ट संचलन तुकडीसाठीचे निकाल घोषित करण्यात आले. भारतीय नौदलाच्या संचलन तुकडीला तिन्ही सेवांमध्ये सर्वोत्तम संचलन तुकडी म्हणून घोषित केले आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआयएसएफ) सीएपीएफ, इतर सहाय्यक दलांमध्ये सर्वोत्कृष्ट संचलन दल म्हणून निवड झाली.