नवी दिल्ली :
भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्लीत झालेल्या आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने अव्वल क्रमांक पटकावला आहे. १५ संघ सहभागी असणाऱ्या या स्पर्धेत, महाराष्ट्राने ‘गोंधळ’ लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण केले. त्याद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विजयी संघ व सांस्कृतिक कार्य विभागाचे अभिनंदन केले.
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीत राजपथावर होणाऱ्या चित्ररथ संचलनामध्ये सहभागी झालेल्या राज्यांना आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेसाठी निमंत्रित केले जाते. यावर्षी स्पर्धेमध्ये १५ सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. विविध राज्ये व केंद्र शासनाच्या विभागानी लोककला व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्तम सादरीकरण केले.
सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील भैरी भवानी परफॉरमिंग आर्ट्स या लोककला समूहाने ‘गोंधळ’ या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण केले. यात १४ कलाकारांनी भाग घेतला. चषकाच्या स्वरूपातील हे पारितोषिक महाराष्ट्रातील नागरिक व कलेस समर्पित केल्याची भावना अमेय पाटील यांनी व्यक्त केली. या कला सादरीकरणामध्ये अमेय पाटील, भावना चौधरी, शिल्पेश तांबे, सुशांत पवार, संजय बलसाने, पारस बारी, अशोक जिंका, निधीशा सॅलियन, हरिश्चंद्र कोटीयन, अंकिता पाटलेकर, हिमानी दळवी, तेजस गुरव, विशाखा मोरे, प्राजक्ता गवळी, वैदेही मोहिते, किरण जुवळे या कलाकारांनी भाग घेतला. या यशाबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय व संचालक विभीषण चवरे यांनी अभिनंदन केले.