उत्तराखंड :
गतवेळच्या विजेत्या महाराष्ट्राने दोन साखळी सामन्यात विजय मिळवीत ‘अ’ गटात अग्रस्थान मिळवीत ‘३१व्या किशोर/किशोरी गट राष्ट्रीय अजिंक्यपद’ निवड चाचणी स्पर्धेत बाद फेरी गाठली. महाराष्ट्राच्या मुलींचे आव्हान दोन पराभवामुळे साखळीतच संपले.
उदमपूर जिल्ह्यातील नानकपुरी, सुद्रापूर येथे झालेल्या सकाळच्या सत्रातील पहिल्या सामन्यात महाराष्ट्राने त्रिपुराचा ४६-०९असा धुव्वा उडवीत साखळीतील पहिल्या विजयाची नोंद केली. मध्यांतरालाच २१-०५ अशी आश्वासक आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने उत्तरार्धात देखील तोच जोश कायम राखत ३७ गुणांच्या मोठ्या फरकाने विजय संपादन केला. आकाश भांडे, सिद्धार्थ मुरूमकर यांच्या झंजावाती चढाया, त्याला नवाज देसाई, नौशाद शेख यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हा विजय सोपा झाला. दुसऱ्या साखळी सामन्यात मात्र त्यांना अधिक कष्ट करावे लागले. कारण त्यांची लढत यजमान उत्तराखंड बरोबर होती. महाराष्ट्राने ही लढत ४२-३५ अशी जिंकत बाद फेरी गाठली. मध्यांतराला महाराष्ट्र २१-२२ अशा एका गुणाने पिछाडीवर होता. पण विश्रांतीनंतर महाराष्ट्राच्या आकाश भांडे, सिद्धार्थ मुरूमकर, रोशन केशी यांनी आक्रमक चढाया करीत भराभर गुण घेतले. त्याला नवाज देसाई, नौशाद शेख यांनी धाडशी पकडी करीत मोलाची साथ देत हा विजय साकारला. यजमान उत्तराखंडने देखील उपविजयी होत बाद फेरी गाठली.
महाराष्ट्राच्या मुलींनी मात्र निराशा केली. ‘ब’ गटातील पहिल्या सामन्यात महाराष्ट्राला दिल्लीकडून ४०-४७ असे ७ गुणांनी पराभूत व्हावे लागले. दुसऱ्या सामन्यात गोव्याने महाराष्ट्राला ३१-३० असे चकविले. या दोन पराभवामुळे महाराष्ट्राच्या मुलींचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले.