मुंबई :
नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स, सांस्कृतिक मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयमार्फत संयुक्तपणे आयोजित ‘कला कुंभ- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या उपक्रमांर्तगत २६ जानेवारीला नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्यात महाराष्ट्राची ‘वारली’ कला दिमाखात प्रदर्शित केली जाणार आहे. पालघरमधील २० वारली कलाकारांनी २६ ते ३० डिसेंबर २०२१ दरम्यान चंदीगड येथील चितकारा विद्यापीठात ६ फूट बाय ४५ फूट आकाराच्या पाच भव्य कॅनव्हासवर समृद्ध आदिवासी संस्कृती रेखाटली आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा एक भाग म्हणून त्यांच्यासोबत देशातून आणखी २३० कलाकार सहभागी झाले होते.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंतच्या आदिवासी संस्कृतीच्या विविध पैलूंचे चित्रण करण्यासाठी पाच कॅनव्हासचा वापर केल्याचे पालघरमधील डहाणूमधील गंजडमधील राजेश वांगड या कलाकाराने सांगितले. प्रत्येक कॅनव्हासच्या संकल्पनेची माहिती देताना २० कलाकारांनी त्यांची ओळख आणि देशभक्ती जिवंत करण्यासाठी एकत्र काम केले. ब्रिटिश काळात आदिवासींना करावा लागलेला ‘संघर्ष आणि स्थलांतर’ या विषयावर पहिला कॅनव्हास आहे. आदिवासींनीच प्रथम विदेशी घुसखोरांविरुद्ध लढा दिला, त्यांच्या वन जमिनी हिसकावून घेतल्या होत्या, त्यांच्यावर अत्याचार आणि अन्याय केला. आदिवासी सैनिकांनी इंग्रजांशी लढताना वापरलेले धनुष्य बाण, दगड सारखी पारंपरिक शस्त्रे या कॅनव्हासमध्ये दाखवली आहेत.
Maharashtra’s #Warli art to be displayed at #RepublicDayParade 2022
20 #Warli artists from Palghar district have employed their artistic skills to portray the rich tribal culture
📘https://t.co/DPB8ziuD9u pic.twitter.com/amSfLphoNe
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) January 24, 2022
दुसर्या कॅनव्हासमध्ये स्वतंत्र भारतातील आदिवासी जीवन आणि इतर बाबी जिवंत केल्या आहेत. यामध्ये वारली कलाकारांनी इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांच्या समाजात आणि राहणीमानात झालेले बदल, त्यांच्या कल्याणासाठीच्या सरकारी योजना, त्यांच्या परंपरा, समारंभ आणि बोलीभाषा या कॅनव्हासमध्ये प्रतीकात्मकपणे मांडण्यात आल्या आहेत. ‘सर्कल ऑफ लाइफ’ नावाच्या तिसर्या कॅनव्हासमध्ये आदिवासींच्या धार्मिक श्रद्धा, देवता, निसर्गाची पूजा, प्राणी, पारंपारिक नृत्य इत्यादीं गोष्टींवर भर दिला आहे. आदिवासींच्या संस्कृतीत वाघाला खूप महत्त्व असल्याने मांजरींच्या प्रजाती केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या भावना दाखवल्या आहेत.
चौथ्या कॅनव्हासमध्ये आदिवासी विवाह सोहळ्यांची संकल्पना आहे. वारली कुटुंबांमध्ये लग्न समारंभावेळी संपूर्ण कुटुंब, लहान मुलांपासून प्रौढ स्त्री-पुरुषांपर्यंत, घराच्या बाहेरच्या भिंती एकत्र रंगवतात. या चित्रांच्या विषयात निसर्ग, झाडे आणि प्राणी यांचा समावेश असतो. त्यात देव-देवतांच्या सभोवताली ‘लग्नचौक’ आणि ‘देवचौक’ नावाच्या पारंपारिक आकृतिबंधांचा समावेश आहे. पाचवा कॅनव्हास त्यांची पारंपरिक शेती आणि कापणीच्या पद्धतींवर केंद्रित आहे.
कला कुंभमधील आमच्या कामांमधून आमच्या परंपरा आणि देशाला स्वातंत्र्यमिळवून देण्यासाठी आमच्या नायकांनी केलेला संघर्ष दाखवला आहे. कला कुंभ कार्यशाळेच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग बनण्याची आणि आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी भाग्यवान समजते, असे यामध्ये सहभागी झालेल्या कलाकार चंदना चंद्रकांत रावते यांनी सांगितले.
दिवंगत पद्मश्री सोमा माशे यांचे कुटुंबीय आणि विद्यार्थी, पालघरच्या डहाणू आणि विक्रमगडमधील कलाकारांमध्ये देवू धोदडे, बाळू धुमाडा, शांताराम गोरखाना, विजय म्हसे, अनिल वनगड, प्रवीण म्हसे, किशोर म्हसे, गणपत दुमाडा, रुपेश गोरखाना, विशाल वनगड, संदेश राजाड,अमित ढोंबरे, मनोज बाडांगे, नितीन बलसी, वैष्णवी गिंभळ, सुनीता बराफ आणि अनिता दळवी यांचा समावेश आहे.