मुंबई:
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. असे असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबवलेल्या उपक्रमांद्वारे राज्यातील विविध कॉर्पोरेट संस्था, कंपन्या, उद्योगांमध्ये या वर्षामध्ये २ लाख १९ हजार १५६ उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून दिला. यामध्ये डिसेंबरमध्येच ४५ हजार १८२ बेरोजगार उमेदवारांना रोजगार दिला असल्याची माहिती विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
बेरोजगार आणि उद्योजकांची सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ बनवले आहे. या संकेतस्थळावर कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स आणि बेरोजगार उमेदवार नोंदणी करतात. महास्वयंम संकेतस्थळावर आजपर्यंत ९३ हजार ८७१ इतक्या उद्योजकांनी नोंदणी केली आहे. कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून यावर्षी विविध कॉर्पोरेट संस्था, कंपन्या, उद्योगांमध्ये २ लाख १९ हजार १५६ जणांना रोजगार उपलब्ध झाला. यामध्ये मुंबई विभाग ८०,६७०, पुणे विभाग ६२,४०३, नाशिक विभाग ३१,६०७, औरंगाबाद विभाग २८,००२, अमरावती विभाग १२,०२० तर नागपूर विभाग ४,४५४ इतके बेरोजगारांना नोकरी मिळाली आहे.
डिसेंबरमध्ये ७,३१४ बेरोजगारांना रोजगार
डिसेंबर २०२१ मध्ये विभागाकडे ६९ हजार ५२ इतक्या नोकरीइच्छूक नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात औरंगाबाद विभागात सर्वाधिक १८,३५७, पुणे विभाग १३,५३९, अमरावती विभाग ११,६५८, मुंबई विभाग ११,३४८, नाशिक विभाग १०,८८९, तर नागपूर विभाग ३,२६१ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी ४५ हजार १८२ उमेदवारांना रोजगार मिळाला. यामध्ये औरंगाबाद विभागात सर्वाधिक १४ हजार ०७३, अमरावती विभागात ९ हजार ४००, नाशिक विभागात ७ हजार ५७०, मुंबई विभागात ७ हजार ३१४, पुणे विभागात ५ हजार ९३१ तर नागपूर विभागात ८९४ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.