Voice of Eastern

मुंबई :

ईशान्य मुंबईतील उद्योन्मुख नेतृत्त्व राजोल संजय पाटील आणि दिना बामा पाटील प्रतिष्ठानतर्फे आयोजित मुंबई क्लासिक २०२२ राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शनिवारी पुणेकर खेळाडूंनी बाजी मारली. एकाहून एक सरस शरीरसौष्ठवपट्टू असलेल्या या स्पर्धेत झालेल्या अटीतटीच्या लढतीत मुंबई आणि उपनगरच्या खेळाडूंचे आव्हान मोडीत काढत ‘महाराष्ट्र श्री’ विजेता महेंद्र चव्हाणने मुंबई क्लासिकवर आपले नाव कोरले. ‘भारत श्री’ सागर कातुर्डेच्या अनुपस्थितीत महेंद्रसमोर एकाही खेळाडूचे आव्हान टिकले नाही.

मुंबई क्लासिकच्या निमित्ताने भांडुप पश्चिमेला पीळदार शरीरयष्टी असलेल्या खेळाडूंची गर्दी झाली होती. लाला शेठ कंपाऊंडमध्ये हजारो क्रीडाप्रेमींना क्लासिक स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठवाची पीळदार श्रीमंती अनुभवायला मिळाली. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला ‘आशिया श्री’ स्पर्धेची दारे उघडणार असल्यामुळे राज्यातून १३४ खेळाडून या स्पर्धेत सहभागी झाले होते. आयोजिका राजोल संजय पाटील यांनीही खेळाडूंवर तब्बल चार लाखांच्या रोख पुरस्कारांची उधळण केली.

सात गटात झालेल्या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात चुरस पाहायला मिळाली. पहिल्या चार गटातील विजेता ठरवताना पंचाना तारेवरची कसरत करावी लागली. ५५ किलो वजनी गटात कोल्हापूरच्या अवधूत निगडेने मुंबईकर नितीन शिगवणला मागे टाकत विजय मिळवला. ६० किलो वजनी गटात सातारच्या रामा मायनाक, ६५ किलो वजनी गटात पुण्याचा सूरज सूर्यवंशी अव्वल ठरला. ७० किलो वजनी गटात मुंबईकर संदीप सावळेने सर्वांचे लक्ष वेधले. ७५ किलो गटात पुणेकर तौसिफ मोमीन पहिला आला. त्याचप्रमाणे मुंबईच्या गणेश पेडामकरने जेतेपट पटकावले. सर्वात मोठ्या गटात महेंद्र चव्हाणसमोर निलेश दगडे आणि सुशांत राजणकर फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत.

महेंद्र चव्हाणला तोड नाही

सागर कातुर्डे आणि सुजन पिळणकर या मुंबईतील दिग्गजांच्या अनुपस्थितीमध्ये महेंद्र चव्हाणला संदीप सावळेने लढत दिली. त्याने अप्रतिम पोझेस मारत पंचाना थक्क केले. मात्र त्याला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. तर गणेश पेडामकरने तिसर्‍या क्रमांक पटकावला. किताब विजेता महेंद्र चव्हाण हा पाऊण लाखाचा मानकरी ठरला तर संदीपला ५० हजार आणि गणेशला २५ हजारांचे रोख इनामाने गौरवण्यात आले. या दिमाखदार स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा माजी आमदार सचिन अहिर, आयोजिका राजोल पाटील, आयोजक आणि आमदार रमेश कोरगावकर तसेच शरीरसौष्ठव संघटनेचे दिग्गज पदाधिकारी अमोल किर्तीकर, प्रशांत आपटे, राजेश सावंत, अजय खानविलकर, विक्रम रोठे, सुनील शेगडे आणि विजय झगडे यांच्या उपस्थितीत पार पडला.

महाराष्ट्राच्या संघासाठी दहा जणांची निवड

जुलैमध्ये होणार्‍या ‘आशिया श्री’ स्पर्धेसाठी २२ मे रोजी हिमाचल प्रदेशात भारतीय संघाची निवड चाचणी घेतली जाणार आहे. या चाचणीसाठी मुंबई क्लासिकमधून विजेता महेंद्र चव्हाण, उपविजेता संदीप सावळेसह गणेश पेडामकर, रामा मायनाक, अवधूत निगडे, भास्कर कांबळी, तौसिफ मोमीन, सुशांत रांजणकर, निलेश दगडे आणि आशीष लोखंडे या १० तगड्या खेळाडूंची निवड करण्यात आली.

Related posts

वडाळा रेल्वे स्थानकातील जवानाने वाचवले प्रवाशाचे प्राण

लाईव्ह सर्जिकलच्या माध्यमातून १५ जणांवर मोफत शस्त्रक्रिया

Voice of Eastern

शिवसैनिकांना कोरोना नियमांचा विसर?

Leave a Comment