मुंबई :
युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात येत आहे. यामध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांना त्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश देताना शैक्षणिक दर्जा खालावणार नाही, याची सरकारने काळजी घ्यावी, अशी भूमिका इंडियन मेडिकल असोसिएशनकडून निवेदनाद्वारे पंतप्रधान कार्यालयास कळवण्यात आली आहे.
युक्रेन, रशिया आणि चीनसारख्या देशात वैद्यकीय शिक्षण स्वस्त असल्याने मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी जातात. सध्या युक्रेन व रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांचे भवितव्यावर अनिश्चितता निर्माण झाली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनला या सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या भवितव्याची आणि भविष्याची चिंता आहे. त्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिवाय वैद्यकीय क्षेत्रात दर्जेदार मनुष्यबळ निर्माण व्हावे यासाठी आयएमएकडून प्रयत्न सुरु आहेत. या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ववत करताना इतर विद्यार्थ्यांवर अन्याय होता कामा नये असे प्रयत्न करावे लागणार असल्याचे आयएमएचे म्हणणे आहे.
युक्रेनमधून आलेल्या मुलांना प्रवेश देण्यासाठी केंद्र सरकारला वैद्यकीय कायद्यात बदल करावा लागणार आहे. विशेषत्वाने फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट ऍक्टमध्ये बदल करावा लागणार आहे. विविध वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देताना त्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अतिरिक्त जागेची परवानगी सरकारकडून मिळवावी लागणार आहे. परदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊन परतणार्या विद्यार्थ्यांना भारतामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी पात्रता परीक्षा द्यावी लागते. यामध्ये फक्त १३ टक्के विद्यार्थी पात्र ठरतात. या सर्व मुद्यांवर विचार करुन कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये असे प्रयत्न व्हावेत असे आयएमएकडून सांगण्यात आले आहे.