Voice of Eastern

मुंबई :

विलेपार्ले येथील गुजराती भाषिक अल्पसंख्यांक दर्जाच्या प्रवीण गांधी विधी महाविद्यालयात यंदा मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आणि प्रमुख वक्तेपद भुषविले. प्राचार्या डॉ. नवशिखा दुआरा यांनी भाषा हा सांस्कृतिक घटक म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर युनेस्कोने कसा हाताळला आणि बांगलादेशच्या भाषेची निर्मिती तसेच महाविद्यालयाच्या भाषिक उपक्रमांची पाहुण्यांना ओळख करुन दिली.

कार्यक्रमाची सुरवात कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दर्‍याखोर्‍यातील शिळा, हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात, ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात’ या मराठी भाषेच्या गौरवगीताने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यानी गायलेल्या वि. म. कुलकर्णी यांच्या ‘माझ्या मराठीची गोडी, मला वाटते अवीट, माझ्या मराठीचा छंद, मना नित्य मोहवीत’ या गीताने मराठीचा स्वभाव मांडला. मराठी भाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे प्रतिनिधिक मनोगत एका विद्यार्थ्याने मांडले. ग्रंथपाल हेमंत शेट्ये यांनी मराठी भाषा दिनाचे महत्व आणि भाषेचे योगदान सांगून प्रमुख पाहुण्यांच्या सामाजिक तसेच विद्यापीठातील शैक्षणिक उपक्रम आणि योगदानाची सर्वांना ओळख करुन दिली. महाविद्यालयाचे अधिक्षक राणे यांनी थोरात यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

वैभव थोरात यांनी त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक विचार तसेच पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मराठी भाषेच्या बाबतीत धोरण स्पष्ट केले. विद्यापीठीय पातळीवरील सिनेट सदस्य म्हणून घेतलेले यशस्वी कार्यक्रम तसेच उपक्रमांची माहिती दिली. विधी अभ्यासक्रमाचे दुरस्थ पद्धतीने बहिशाल शिक्षण सुरू करण्याची योजना मांडली. तसेच महाविद्यालयाचा भाषिक अल्पसंख्यांक दर्जा असूनही आत्मीयतेने साजरा करीत असलेल्या मराठी भाषिक दिनाचे विशेष कौतूक केले. महाविद्यालयाच्या मुलांना भविष्यात कोणत्याही विद्यापीठीय पातळीवरील शैक्षणिक अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले. यशवंतराव चव्हाण यांच्या चरित्रातील मराठीचे महत्व सांगून त्यानी कोर्टात तसेच पोलीस ठाण्यात केस हाताळताना विद्यार्थ्यानी आपला भाषिक आत्मविश्वास कसा वाढवावा याचे मार्गदर्शन केले. पाहुण्यांच्या भाषणानंतर प्राध्यापिका कविता शर्मा यांनी प्रवीण गांधी विधी महाविद्यालय हाती घेत असलेल्या न्यायालयीन मराठी प्रमाणपत्र शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली. महाविद्यालयीन कर्मचारी नमिता राउळ यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

Related posts

बेस्टच्या वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर मनसेचा पुढाकार

Voice of Eastern

दसरा मेळाव्यासाठी रायगड जिल्ह्यातून ४० हजार शिवसैनिक दाखल

विक्रोळीतील महिला व मुलींना स्वरक्षणाचे धडे

Leave a Comment