मुंबई :
नांदेड शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांसोबत केलेल्या गैरवर्तणुकीबद्दल केंद्रीय मार्डकडून आज संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये यासाठी हे आंदोलन दुपारी २ वाजल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये करण्यात येणार आहे. मात्र निषेध म्हणून डॉक्टर त्यांच्या हातावर काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे मार्डकडून सांगण्यात आले.
नांदेड शासकीय रुग्णालयात २४ जणांचा मृत्यू झाल्यामुळे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठातांना स्वच्छतागृह साफ करायला लावून त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. या कृत्याविरोधात केंद्रीय मार्डने बुधवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेत त्यांच्यासमोर खासदारांच्या कृत्याचा निषेध केला. त्यावर संबंधित खासदारांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र हेमंत पाटील यांनी जाहीर माफी मागावी या मागणी मार्डचे पदाधिकारी ठाम राहिले. पाटील यांच्या कृत्याचा निषेध करण्यासाठी केंद्रीय मार्डकडून ५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन पुकारण्यात येणार आहे. तसेच निषेध म्हणून डॉक्टर त्यांच्या हातावर काळ्या फिती लावून काम करणार आहेत. रुग्णसेवेशी कोणत्याही प्रकारची तडजोड होऊ नये यासाठी ओपीडीनंतर दुपारी २ वाजल्यानंतर हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात प्राध्यापक, निवासी डॉक्टर्स, प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. खासदार हेमंत पाटील यांनी जाहीर माफी न मागितल्यास केंद्रीय मार्डकडून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा केंद्रीय मार्डचे अध्यक्ष डॉ. अभिजीत हेलगे यांनी दिला आहे.