मुंबई :
कोरोना काळातील शैक्षणिक शुल्क माफ करण्यासाठी निवासी डॉक्टरांच्या संघटनेने १ ऑक्टोबरपासून राज्यातील रुग्णालयात बेमुदत आंदोलन पुकारले आहे. मात्र मार्डकडून प्रसारमाध्यमांद्वारे संपाबाबत दिलेली माहिती, रुग्णालय प्रशासनाची तयारी आणि काही निवासी डॉक्टरही उपस्थित राहिल्याने ओपीडीतील रुग्णसेवेवर फारसा परिणाम जाणवला नाही. परंतु अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता नियोजित शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या.
गतवर्षी निवासी डॉक्टर हे कोरोना ड्युटीमध्ये व्यस्त होते. कोरोना ड्युटीमुळे त्यांचा अभ्यासक्रम झाला नाही. त्यामुळे गतवर्षीचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे करण्यात आली होती. त्यावर वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनीही सकारात्मकता दर्शवली होती. मात्र आता वर्ष उलटत आले तरीही त्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने अखेर शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून मार्डने राज्यभरात बेमुदत आंदोलन पुकारले. या आंदोलनात राज्यातील ५५०० मार्डचे डॉक्टर सहभागी झाले आहेत. रुग्णालयातील ओपीडीतील कामकाज हे निवासी डॉक्टरांमार्फतच चालते. त्यामुळे ओपीडीवर परिणाम होऊ नये यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून विभाग प्रमुख, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे ओपीडीतील रुग्णांना फारसा परिणाम जाणवला नाही. जे.जे. रुग्णालयात ओपीडीतील रुग्णसेवेवर फारसा परिणाम जाणवला नाही. ओपीडीमध्ये २८०० रुग्णांवर उपचार झाले. दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर यांनी दिली. मार्डकडून आंदोलनाबाबतची माहिती प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध करण्यात आल्याने शुक्रवारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची फारशी गर्दी नव्हती. त्याचप्रमाणे रुग्णालय प्रशासनाने केलेल्या तयारीमुळे आलेल्या रुग्णांवरही व्यवस्थित उपचार झाले.
नायर रुग्णालयातील ७० टक्के निवासी डॉक्टर संपात सहभागी न होता कर्तव्यावर हजर होते. नियोजित शस्त्रक्रिया रद्द झाल्या असल्या तरी महत्त्वाच्या शस्त्रक्रिया पार पाडल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. सायन रुग्णालयात ओपीड बंद होती. मात्र अतिदक्षता विभाग सुरू होते. आपत्कालिन शस्त्रक्रिया केल्याचे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. केईएममध्ये ही साधारण परिस्थिती दिसून आली.