मुंबई :
दादर फुल मार्केट म्हणजे स्वस्तात फुले मिळण्याचे ठिकाण मात्र मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी या बाजारातही फुलांचे भाव गगनाला भिडले. गुरुवारी सकाळीच फुल विक्रेत्यांनी अष्टयाची फक्त ४ फुले ३० रुपयांना तर १२ ते १५ फुले ५० रुपयांत विकून मोठा नफा कमावला.
मार्गशीर्षमध्ये महिला दर गुरुवारी महालक्ष्मी देवीचा उपवास करतात. देवीची मनोभावे पुजाअर्चा करून सुखी कुटुंबासाठी प्रार्थना करतात. देवीच्या पूजेसाठी लागणारी फुले, वेण्या, हार, गजरे आणि पाच झाडांची पाने घेण्यासाठी भाविक दर गुरुवारी फुल मार्केटमध्ये गर्दी करतात. याचाच फायदा घेत फुल विक्रेते चढ्या भावाने फुलांची विक्री करतात. महिला सुवासिनींना शेवटच्या गुरुवारी अष्टयाची फुले व छोटी भेट वस्तू वाटण्यात येतात. दादर फुल मार्केटमध्ये नेहमी मिळणारा ५ रुपयांचा छोटा हार १० रुपये, शेवंतीच्या फुलांची वेणी किमान १० रुपयांची ती १५ ते २० रुपये, ५ प्रकारची फळे छोटी ४० ते ५० रुपये, सुटी फुले २५० ग्रॅम ३० रुपये तर ५०० ग्रॅम फुले ५० रुपये म्हणजेच १ किलो १०० रुपये दराने विकण्यात आली. त्यामुळे महिलांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.