Voice of Eastern

उल्हासनगर :

उल्हासनगर येथील शहाडजवळील सेंच्युरी रेयॉन कंपनीतील सीएस-2 प्लॉण्टमध्ये शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास केमिकल टॅंकरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून पाचपेक्षा अधिक कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर १ येथील शहाडजवळील सेंच्युरी रेयॉन ही बिरला ग्रुपची कंपनी आहे. या कंपनीमध्ये विस्कोस धागा तयार होतो. शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कपंनीच्या सीएस २ या केमिकल प्लांटमध्ये टॅंकरमध्ये केमिकल भरत असताना अचानक स्फोट झाला. स्फोट इतका मोठा होता की कपंनी आणि आसपासचा परिसर हादरून गेला. कपंनीत कामगारांची पळापळ सुरु झाली. या शिवाय कपंनीच्या बाहेर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या स्फोटात प्लांटमध्ये काम करीत असलेले शैलेश यादव (२६), राजेश श्रीवास्तव (४६), अनंत डिंगोरे (५०) या तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तसेच सागर झालटे, अशोक शर्मा, टँकर चालक पंडित मोरे यांच्यासह पाचपेक्षा अधिक कामगार जखमी झाले आहेत. स्फोट झालेला टॅंकर हा कंपनीच्या सीएस २ प्लांटमधून केमिकल घेण्यासाठी आला होता. हा स्फोट इतका जबरदस्त होता की स्फोटाने आजूबाजुच्या परिसरातील तानाजी नगर, शहाड गावठण, गुलशन नगर, धोबीघाट, शिवनेरी नगर येथील घरांना जबर हादरे बसल्याने नागरिक भयभीत झाले.

स्फोटाची माहिती मिळताच आमदार कुमार आयलानी, माजी आमदार पप्पु कलानी यांनी सर्वप्रथम सेंच्युरी कंपनीच्या रुग्णालयाला भेट देऊन जखमींची चौकशी केली. भाजपचे शहराध्यक्ष प्रदीप रामचंदानी, शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, सेना नेते नाना बागुल, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांच्यासह स्थानिक नेत्यांनी जखमींची चौकशी केली. दरम्यान स्फोट घडल्यावर उल्हासनगर महापालिकेचे सुरक्षा प्रमुख बाळु नेटके यांनी कंपनीत जाऊन पाहणी केली. घटनास्थळी धाव घेऊन सहायक पोलिस आयुक्त अमोल कोळी, उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी आपल्या पोलिस पथकासह कंपनीमध्ये चोख बंदोबस्त ठेऊन कपंनी परिसरात जमा झालेल्या जमवाला नियंत्रित केले. हा भीषण स्फोट कसा झाला याची चौकशी पोलीसांनी सुरु केली आहे. या घटनेला जबाबदार व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

या प्रकरणी सी एस २ प्लांट चालवणाऱ्या अधिकारी व कपंनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे कपंनीचे जनसपंर्क अधिकारी मेहुल लालका यांनी सांगितले की, हा स्फोट कसा झाला याबाबत कपंनीचे विशेष पथक या घटनेची सखोल चौकशी करीत आहे. तसेच या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व त्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्यात येईल आणि जखमीना मोफत उपचार व आर्थिक मदत करण्यात येईल अशी माहिती लालका यांनी दिली आहे.

Related posts

औरंगाबाद येथील महारोजगार मेळाव्यात ५ हजारपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी – कौशल्य विकास मंत्री

३८ वर्षीय पुरुषाच्या कुल्ल्यातून ४ सेमी आकाराची दुर्मिळ कर्करोगाची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश

Voice of Eastern

राज ठाकरे यांचे पवार यांच्यावरील वक्तव्य नैराश्यातून – महेश तपासे

Leave a Comment