मुंबई :
पूर्व उपनगरांतील रस्त्यावर पडलेले खड्डे आठ – दहा दिवसांत तातडीने बुजविण्याचे आदेश महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. खड्डयांबाबत तीव्र संताप व्यक्त करत त्यांनी संबंधित पालिका अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. तसेच याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने पालिका अधिकारी, कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत.
मुंबईतील खड्डे समस्येवरून विरोधी पक्ष, भाजप गटनेते, नगरसेवक यांनी सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. याची दखल घेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी कुर्ला येथील जरीमरी मार्ग तसेच चेंबूर येथील सुभाष नगर मार्गावरील खड्डयांची सोमवारी स्वतः पाहणी केली. पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडणे समजू शकते. पण गणपती विसर्जनानंतरही रस्त्यांची स्थिती अशी असेल तर ही बाब गंभीर आहे, असे सांगत त्यांनी रस्त्यावरील खड्डयांबाबत तीव्र संताप व्यक्त केला. या संपूर्ण रस्त्यांवरील खड्डांची उपायुक्त पायाभूत सुविधा तसेच प्रमुख अभियंता रस्ते यांच्यामार्फत चौकशी करून अहवाल देण्याचे तसेच, खड्डे बुजवण्यासाठी सहाय्यक अभियंता रस्ते यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे, असे आदेश महापौरांनी यावेळी दिले.