पणजी :
ऑलिम्पिक खेळाडू माना पटेल हिने गोव्यातील डॉ के. बी. हेडगेवार शाळेला भेट दिली आणि राज्यातील ७५ शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. माना पटेल हिने पंतप्रधाना नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसाठी संतुलित आहार आणि शारिरीक तंदुरुस्तीसाठी सुरू केलेल्या ‘मीट द चॅम्पियन्स’ उपक्रमाची गोव्यात सुरुवात केली.
आपल्या आहारानुसार आपले शरीर घडते. त्यामुळे आहारात प्रथिने, कार्बोहायड्रेटस यांचा समतोल असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी जंकफूड टाळून फळे आणि भाजीपाला यांचा आहारात समावेश करावा, असा सल्ला माना पटेल हिने विद्यार्थ्यांना दिला. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास आणि खेळाचा समतोल साधण्याचा सल्लाही दिला. तसेच जे काही क्षेत्र निवडाल त्याची मनापासून तयारी करा, असे ती म्हणाली. राज्यातल्या ७५ शाळांतील ३०० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.
माना पटेल ही नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये जलतरणाच्या १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारासाठी पात्र ठरलेली पहिली महिला आहे. ‘मीट द चॅम्पियन्स’ उपक्रमाचा आरंभ टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राने डिसेंबर २०२१ मध्ये केला. आतापर्यंत या उपक्रमांतर्गत बजरंग पुनीया, पॅरालिम्पिक पदकविजेते मरियप्पन थंगवेलू, योगेश कथुनिया यांनी शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांमध्ये खेळांप्रती रुचीनिर्माण करण्याचे प्रयत्न केले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाने संयुक्तरित्या या अनोख्याउपक्रमाचे आयोजन केले आहे.
टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारताच्या प्रचंड यशानंतर जेंव्हा पंतप्रधान मोदींनी खेळाडूंशी संवाद साधत, त्यांना ७५ शाळांना भेट देण्याची आणि संतुलित आहारआणि तंदुरुस्तीचे महत्त्व सांगण्याची विनंती केली होती, त्यानंतर हा उपक्रम सुरू करण्यात आला.