मुंबई :
विदर्भ आणि मराठवाड्यावरील अवकाळी पावसाचे सावट दूर झाले आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात कोठेही पाऊस पडणार नसून, हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. परंतु सध्या पश्चिम आणि उत्तर भारतामध्ये थंडीने कहर माजवला आहे. त्यामुळे देशात विविध ठिकाणी तापमानात घट झाली असून, त्याचा फटका महाराष्ट्रालाही बसला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील तापमान हे १० अंशाच्या खाली आले आहे.
उत्तर भारतात थंडीची लाट तर पूर्वेकडील राज्यांमध्ये पावसाचा कहर सुरू असल्याने देशातील वातावरणात मोठे बदल घडून येत आहेत. परिणामी महाराष्ट्राती अनेक ठिकाणी तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पुण्यातील पाषाण येथे सर्वाधिक कमी तापमान (१०.९ अंश सेल्सियस) नोंदवण्यात आले आहे. त्यापाठोपाठ पुण्यामध्ये राजगुरूनगर (११), हवेली (११), एनडीए (११.३), माळीण (११.७), तळेगाव (१२.१) आणि शिवाजीनगर (१२.१) इतकी तापमानाची नोंद झाली आहे. पुण्याबरोबरच जळगाव ११, गोंदिया ११, नाशिक ११.४, महाबळेश्वर ११.७, बारामती ११.८, चिखलठाणा १२, मालेगाव १२.४, सातारा १३.१, परभणी १३.१, उस्मानाबाद १४, नांदेड १४.२ आणि माथेरान १५.४ अंश सेल्सियस अशी नोंद झाली आहे. तापमानात घट झाली असली तरी येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.