पुणे :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे ६ मार्च २०२२ रोजी उद्घाटन झाले . पुण्यातील नागरी वाहतुकीसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प आहे.
२४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांनी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. एकूण ३२.२ किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या १२ किमी लांब मार्गाचे उद्घाटन रविवारी पंतप्रधानानी केले. संपूर्ण प्रकल्प ११ हजार ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून बांधला जात आहे. पंतप्रधानांनी गरवारे मेट्रो स्थानकातील प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पाहणी केली आणि त्यानंतर अँपच्या माध्यमातून मेट्रो तिकीट विकत घेऊन पंतप्रधानांनी उपस्थित मान्यवर यांच्यासह आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी युवा विशेषतः दिव्यांग मुला-मुलींशी संवाद ही साधला.