मुंबई :
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळसेवा भरतीअंतर्गत अतांत्रिक पदासाठी ७ फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होईल, अशी माहिती ‘म्हाडा’चे सचिव राजकुमार सागर यांनी दिली. भारतरत्न,गानसम्रज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्य सरकारने दुखवटा म्हणून ७ फेब्रुवारी २०२२ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे परीक्षार्थींच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी म्हाडाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
म्हाडा सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत अतांत्रिक संवर्गातील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक पदांसाठी ७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ९ ते ११ आणि दुपारी १२.३० ते २.३० पर्यंत तर दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अशा तीन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र रविवारी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्य सरकारने दुखवटा म्हणून ७ फेब्रुवारीला दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे परीक्षेबाबत परीक्षार्थींच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी सोमवारी होणारी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे परिपत्रकाद्वारे जाहीर केले असून, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी असे आवाहन मंडळाचे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे.