मुंबई
दक्षिण मुंबईतील गिरगाव परिसरातील एलआयसी ऑफ इंडियाची मालकी असलेल्या १२५ वर्ष जुन्या इमारती/चाळींचा पुनर्विकास मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या (म्हाडाचा विभागीय घटक) माध्यमातून करण्यासंदर्भातील भाडेकरू/रहिवासी यांच्या मागणीबाबत चर्चेसाठी एलआयसी ऑफ इंडियाचे अधिकारी, खासदार अरविंद सावंत, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर व चाळींतील रहिवाशांची संयुक्त बैठक आज घेण्यात आली.
एलआयसी ऑफ इंडियाचे चेअरमन एम आर कुमार यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला एलआयसी ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक एस मोहंती, उमा राव, म्हाडाचे वित्त नियंत्रक . विकास देसाई, कार्यकारी अभियंता रुपेश राऊत आदी उपस्थित होते.
एलआयसी ऑफ इंडियाच्या मालकीच्या दक्षिण मुंबईत अँग्रेवाडी चाळ, नवीन बदामवाडी, देवकरण नाणजी १२५ वर्ष जुन्या चाळी असून या चाळींमध्ये सुमारे ८२ जुन्या उपकरप्राप्त इमारती असून त्यामध्ये १ हजार ६८ निवासी सदनिका तर ९८४ अनिवासी सदनिका अशा एकूण २ हजार ५२ सदनिका आहेत.
सन १९४० पूर्वी बांधलेल्या या उपकरप्राप्त इमारतींची दुरुस्ती व देखभाल मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत अनेक वेळा करण्यात आली. मात्र, या इमारती अत्यंत जीर्ण झाल्या असून त्यांची दुरावस्था झाली असून या इमारती दुरुस्ती करण्यापलीकडे गेल्या आहेत.
त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास विकास नियंत्रण नियमावली ३३(७) व ३३ (९) अन्वये म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत करता येऊ शकतो, अशी भूमिका मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती घोसाळकर व खासदार अरविंद सावंत यांनी या बैठकीत मांडली. एलआयसी ऑफ इंडियाने या इमारतींच्या पुनर्विकास संदर्भात तात्काळ म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला प्रस्ताव देण्याचे सभापती विनोद घोसाळकर यांनी सांगितले.
एलआयसी ऑफ इंडियाचे चेअरमन कुमार यांनी एलआयसी ऑफ इंडियातर्फे लवकरच याबाबत सकारात्मक विचार करून मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला इमारतींच्या पुनर्विकासाबाबत प्रस्ताव देण्याचे मान्य केले.
—