मुंबई :
घाटकोपरमध्ये गोकुळ, गोविंद आणि अमूल या दुधांच्या पिशव्यांमध्ये भेसळ करणार्या टोळीच्या गुन्हे शाखेच्या घाटकोपर युनिटच्या अधिकार्यांनी मुसक्या आवळल्या. पारश रामालू फुल्लेपेडला, सुरेश सोमय्या पनीकर, विनोदकुमार जगदीश गौड आणि वैकय्या बलेहा सिंगाराम अशी अटक केलेल्यांची नावे असून, पुढील चौकशीसाठी त्यांना पंतनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
घाटकोपर येथील पंतनगर, ९० फिट रोडवर दूधात भेसळ करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती एपीआय सुनयना सोनावणे यांना मिळाली होती. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक मनिष श्रीधनकर, सुनयना सोनावणे यांच्या पथकाने गुरुनानक नगरमधील एका खोलीमध्ये गुरुवारी सकाळी पाच वाजता छापा टाकला होता. यावेळी तिथे गोकुळ, गोविंद आणि अमुल या नामांकित कंपन्याच्या दूधात भेसळ करण्यात येत होती. कारवाईत पोलिसांनी या तिन्ही कंपन्याचे ६१९ भेसळयुक्त दूध, १६५५ बोगस दूधाच्या मोकळ्या पिशव्या आणि दूध भेसळीसाठी लागणारे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरुद्ध भादवीसह अन्न सुरक्षा मानदे कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत चारही आरोपींना पुढील चौकशीसाठी पंतनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.