Voice of Eastern
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

कामा रुग्णालयात छोट्या स्वरुपातील शस्त्रक्रिया पुन्हा सुरू होणार; रुग्णांना मिळणार दिलासा

banner

मुंबई :

मुंबईतील महिला व मुलांसाठी प्रसिद्ध असलेले कामा रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर या आठवड्यापासून कामा रुग्णालयातील छोट्या स्वरुपातील शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन महिन्यांपासून शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने जानेवारी २०२२ पासून निर्बंध अधिक कडक करण्यात आले होते. कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता सेंट जॉर्ज, जीटी रुग्णालय हे कोविड समर्पित करण्यात आले तर कामा रुग्णालयातही महिला रुग्णांना दाखल करण्यात येत होते. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता मोठ्या व महत्त्वाच्या शस्त्रक्रिया वगळता सर्व शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या होत्या. ज्या रुग्णांवर औषधोपचाराच्या माध्यमातून शस्त्रक्रिया लांबणीवर टाकणे शक्य आहे, अशा रुग्णांना कोविड परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर बोलवण्यात आले होते. त्यानुसार काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्याने मुंबईसह राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले. ही बाब लक्षात घेता आता कामा रुग्णालयातील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या आठवड्यापासून छोट्या स्वरुपातील शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेवेळी आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध ठेवण्यात आला असून, सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. ओपीडीमध्ये येणार्‍या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी वेळ देण्यात येणार असून, त्याद़ृष्टीने शस्त्रक्रियेचे नियोजन करण्यात येणार असल्याचे कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.

कामा रुग्णालयात साधारणपणे दररोज १५० पेक्षा अधिक रुग्ण ओपीडीमध्ये उपचारासाठी येतात. तर ५० रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत असतात. मात्र कोरोनाच्या काळामध्ये असलेल्या विविध निर्बंधामुळे कामा रुग्णालयातील ओपीडीत येणार्‍या रुग्णांची संख्या सरासरी १५० पर्यंत कमी झाली आहे. तसेच रुग्ण दाखल होण्याची संख्याही ३० झाली आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल होत असल्याने रुग्णालय पुर्णपणे सुरू होणार असल्याने रुग्णांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Related posts

भावी शिक्षक, वकील अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या प्रतीक्षेत

पीआरएन चुकलेल्या विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका मिळणार

Voice of Eastern

मेरू मोहिमेचा बेस कॅम्प उभारला, आता तयारी शिखर चढाईची!

Leave a Comment