Voice of Eastern

मुंबई

एआयसीटीई व यूजीसीने मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेला (आयडॉल) या शैक्षणिक वर्षापासून एमएमएस व एमसीए हे अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार आयडॉलकडून प्रवेश परीक्षा शुक्रवारी ३ डिसेंबरला घेण्यात येणार होती. आयडॉलमधून शिक्षण घेणारे विद्यार्थी नोकरी करून शिकणारे असल्याने त्यांच्या सोयीसाठी ही परीक्षा शुक्रवारऐवजी रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी व युवासेनेकडून करण्यात आली होती. त्याची दखल घेत अखेर विद्यापीठाने या दोन्ही परीक्षांची तारीख पुढे ढकलत रविवारी ५ डिसेंबरला घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

२०२१-२२ या शैक्षणिक वर्षांपासून एआयसीटीई व यूजीसीने आयडॉलला मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमएमएस) या अभ्यासक्रमासाठी ७२० जागांची मान्यता दिली असून हा अभ्यासक्रम प्रथमच आयडॉलमधून दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरु होत आहे. हा अभ्यासक्रम एमबीए या अभ्यासक्रमाच्या समकक्ष आहे. तसेच आयडॉलमध्ये प्रथमच मास्टर ऑफ कॉम्प्युटर अँप्लिकेशन (एमसीए ) हा दोन वर्षाचा सुधारित अभ्यासक्रम सुरु होत आहे. आजपर्यंत एमएमएस या अभ्यासक्रमासाठी ५८४ प्रवेश अर्ज प्राप्त झाले असून एमसीए या अभ्यासक्रमासाठी ७०१ प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र या दोन्ही अभ्यासक्रमांची परीक्षा शुक्रवारी ३ डिसेंबरला होणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य होणार नव्हते. ही बाब लक्षात घेऊन युवासेनेचे सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी ही परीक्षा शुक्रवारऐवजी रविवारी किंवा अन्य सुट्टीच्या दिवशी घेण्याची मागणी विद्यापीठाकडे केली होती. या मागणीची दखल घेत अखेर आयडॉलकडून परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला असून, दोन्ही अभ्यासक्रमाची परीक्षा रविवारी ५ डिसेंबरला घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. युवासेनेच्या मागणीची दखल घेत मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल, असे सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी सांगितले.

प्रवेश अर्ज भरण्यास मुदतवाढ
एमएमएस व एमसीए या दोन्ही प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन माध्यमातून मागविण्यात येत असून ते विद्यापीठाच्या https://old.mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. हे प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन उपलब्ध होत आहेत. अर्ज भरण्याची शेवटची मुदत २५ नोव्हेंबर होती. परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार प्रवेश परीक्षांच्या अर्जास २९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या प्रवेश परीक्षेची सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Related posts

महामार्गावरील अपघातग्रस्तांवर आता कॅशलेस उपचार

Voice of Eastern

मध्यान्ह भोजनाचा तांदूळ पुरविण्यात केंद्रसरकार असमर्थ

सरकारी शाळांमधील ७०० मुलांनी एलिव्हेट २०२३ मध्ये सादर केली गुणवत्ता व नेतृत्व कौशल्ये

Voice of Eastern

Leave a Comment