मुंबई
राज्यात रविवारी ओमायक्रॉनचे आणखी ६ नवे रुग्ण सापडले. यामध्ये मुंबई विमानतळ सर्वेक्षणात ४, पुणे व पिंपरी -चिंचवडमध्ये प्रत्येकी १ रुग्ण सापडला. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉनची संख्या ५४ वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत २८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
परदेशातून येणार्या प्रवाशांची मुंबई विमानतळावर सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणातून रविवारी ४ रुग्ण ओमायक्रॉनचे सापडले. यातील एक रुग्ण दमणचा असून, दोन रुग्ण कर्नाटक व एक रुग्ण औरंगाबादमधील रहिवासी आहे. औरंगाबादमधील २१ वर्षीय महिला व दमणमधील ४१ वर्षीय पुरूष हे १४ डिसेंबरला इंग्लंडमधून भारतात आले होते. या दोघांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असून, औरंगाबादमधील महिलेने फायझरची तर दमणमधील व्यक्तीने एसट्राझेनेकोची लस घेतलेली होती. या दोघांमध्ये कोणतीही लक्षणे नसून, तपासणी अहवाल सकारात्मक आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचप्रमाणे औरंगाबाधमधील दोन्ही व्यक्ती या टांझानियामधून १४ डिसेंबरला आल्या असून, यामध्ये ५७ वर्षीय पुरुष व ३८ वर्षीय महिलेचा समावेश असून, त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे नव्हती. या दोघांनीही कोव्हिशिल्डची लस घेतली होती. या सर्वांना सध्या मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात विलगीकरणात ठेवले आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संपर्कातील एका ५ वर्षीय मुलामध्ये ओमायक्रॉन विषाणूचे निदान झाले आहे. या रुग्णास कोणतीही लक्षणे नाहीत. तसेच पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील मध्यपूर्वेत प्रवास करुन आलेल्या ४६ वर्षीय पुरुषांमध्ये ओमायक्रॉन विषाणू आढळला आहे. या रुग्णाची लक्षणे सौम्य असून तो सध्या एका खाजगी रुग्णालयात भरती आहे. त्याचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. मुंबईतील २२ रुग्णांपैकी १३ रुग्ण हे मुंबई बाहेरील आहेत.