मुंबई :
देशात स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेत प्रचंड प्रगती झाली आहे. अभियान सुरू झाल्यापासून आतापर्यंत ग्रामीण भागात तब्बल १०.८६ कोटींहून अधिक शौचालये बांधण्यात आली आहेत. त्यामुळे गावे हागणदारी करण्याच्या योजनेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०२१-२२ संसदेत सादर करताना ही माहिती दिली. देशामध्ये २ ऑक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियान सुरू झाले. त्यानंतर देशातील सर्व गावे हागणदारी मुक्त करण्याच्या उद्देशाने स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसर्या टप्प्यात हागणदारीमुक्त प्लस अभियान हाती घेण्यात आले. २०२०-२१ ते २०२४-२५ दरम्यान हे अभियान राबवण्यात येत आहे. २०२१-२२ मध्ये देशात नवीन कुटुंबांसाठी ७.१६ लाख वैयक्तिक घरगुती शौचालये आणि १९ हजार ६१ सामुदायिक स्वच्छता संकुल बांधण्यात आले. तसेच २,१९४ गावे हागणदारीमुक्त प्लस म्हणून घोषित करण्यात आली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१९-२१ च्या पाचव्या फेरीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निष्कर्षानुसार, सुधारित स्वच्छता सुविधांचा वापर करणार्या घरांमध्ये राहणारी लोकसंख्या २०१५-१६ मधील ४८.५ टक्क्यांवरून २०१९-२१ मध्ये ७०.२ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
५.५ कोटीहून अधिक घरांना नळजोडणी
देशामध्ये जल जीवन अभियान ऑगस्ट २०१९ मध्ये सुरू झाले. त्यावेळी ग्रामीण भागातील १८.९३ कोटी कुटुंबांपैकी सुमारे ३.२३ कोटी म्हणजे १७ टक्के कुटुंबांच्या घरात नळ होते. २ जानेवारी २०२२ पर्यंत देशातील ५,५१,९३,८८५ घरांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सहा राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांनी १०० टक्के घरांना नळाद्वारे पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट प्राप्त केले असून, ८३ जिल्हे, १०१६ तालुके , ६२,७४९ पंचायती आणि १,२८,८९३ गावांनी, १०० टक्के घरांना नळजोडणीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. जल जीवन अभियानांतर्गत ८,३९,४४३ शाळांना पाणीपुरवठा करण्यात आला.