मुंबई:
भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने संपूर्ण देशात १२ नोव्हेंबरला राष्ट्रीय संपादणूक सर्वेेक्षण होणार आहे. या सर्वेक्षणात राज्यातील ७३३० शाळांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या या शाळामंधील तब्बल २ लाख ३४ हजार ५५ विद्यार्थी या परीक्षेला उपस्थित राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी संबंधित क्षेत्रिय यंत्रणांना सर्वेक्षणाची अंमलबजावणी अचूक व वेळेवर पूर्ण करण्यासंदर्भातील सूचना दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमधील संपादणुकीचे मूल्यांकन करणे व देशाच्या शिक्षण प्रक्रियेच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी देशात एकाच वेळी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण घेण्यात येणार आहे. या सर्वेक्षणातून प्राप्त विद्यार्थी संपादणूक माहितीचे अहवाल जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वेक्षणासाठी निवड झालेल्या शाळा व क्षेत्रिय यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे हे सर्वेक्षण तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या वर्गांमध्ये होणार असल्याने या वर्गातील शिक्षक व विद्यार्थी यांची उपस्थिती १०० टक्के ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणासाठी सर्वाधिक शाळांची निवड पुणे जिल्ह्यातून २३४ इतकी झाली आहे. त्याखालोखाल नागपूर २३२, औरंगाबाद २२८, ठाणे २२४, अहमदनगर २२३, यवतमाळ २२२, पालघर, नांदेड २१९ शाळांची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे मुंबई शहर जिल्ह्यातून १५२ तर उपनगर जिल्ह्यातून १४० शाळांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी निवड झालेल्या शाळेतील शिक्षकांनी सकाळी ७.३० वाजता तर विद्यार्थ्यांना सकाळी ८ वाजता शाळेत उपस्थित राहायचे आहे. सर्वेक्षणाचे काम २ वाजेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी घरातून जेवणाचे डबे, पाणी सोबत बाळगण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. निवड झालेल्या शाळांमध्ये कोविड १९ संदर्भातील सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणावेळी एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल, बाके उपलब्ध नसल्यास स्वच्छ चटई वापरून पुरेसे अंतर राखण्यात यावे, अशा सूचनाही दिल्या आहेत.
कशा प्रकारे होणार चाचणी?
इयत्ता ३ री व ५ वीचे विद्यार्थ्यांसाठी संपादणूक सर्वेक्षण चाचणी सोडवण्याची प्रत्यक्ष वेळ सकाळी १०.३० ते १२ पर्यंत असेल तर इयत्ता ८ वी व १० वीचे विद्यार्थ्यांसाठी चाचणी सोडवण्याची प्रत्यक्ष वेळ सकाळी १०.३० ते १२.३० पर्यंत असेल. दुपारी १२ ते १२.३० ला चाचणी सोडवल्यानंतर विद्यार्थ्यांना जेवण व इतर बाबींसाठी कमाल १० मिनिटे विश्रांती द्यावी. यावेळेत कोणताही विद्यार्थी शाळेच्या किंवा प्रांगणाच्या बाहेर जाणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी व त्यानंतर विद्यार्थ्यांकडून विद्यार्थी प्रश्नावली भरून घेण्यात यावी.
नॅससाठी निवड झालेल्या शाळा, विद्यार्थ्यांची संख्या
वर्ग शाळा विद्यार्थी
तिसरी १६३१ ४०५७६
पाचवी १५५९ ४००७४
आठवी २६४१ ७१८७९
दहावी २८०१ ८१५२६
एकूण ७३३० २,३४,०५५
सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहता कामा नये – गायकवाड
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाच्या अनुषंगाने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राचार्य आणि संबंधितांची ऑनलाईन बैठक झाली. यामध्ये सर्वेक्षणाबाबतच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत येता यावे यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची सूचना अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा केली. तर सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले.