मुंबई :
मकर संक्रात हा उत्सव सर्वांकडून उत्साहात साजरा करण्यात आली. आकाशामध्ये पतंग उडवून मकर संक्रात नागरिकांकडून साजरी करण्यात आली असली तरी ही संक्रात तब्बल २५ पेक्षा अधिक कबुतर आणि एका घारीच्या जीवावर बेतली आहे. या कबुतरांवर उपचार बैलघोडा रुग्णालयाकडून उपचार करण्यात आले आहेत.
मकर संक्रांतीनिमित्त मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्यात येतात. परंतु पतंगासाठी वापरण्यात येणारा मांजा हा दरवर्षी अनेक पक्षांच्या जीवावर बेतत असतो. असे असतानाही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत पतंग उडवत असतात. यावर्षी मुंबईमध्ये मकर संक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्यात आले. मात्र नागरिकांचा हा आनंद पक्षांच्या जीवावर बेतला आहे. पतंगांच्या मांजामध्ये अडकून जवळपास २५ कबुतरे आणि एक घार जखमी झाली आहे. संक्रातीच्या दिवशी पक्षी जखमी होण्याची संख्या लक्षात घेता दी बाई साकरबाई दिनशॉ पेटिट हॉस्पिटल फॉर अॅनिमल (बैलघोडा) या रुग्णालयातर्फे विशेष रुग्णवाहिका शहरामध्ये तैनात करण्यात आली होती. रुग्णालयाच्या ०२२२४१३७५१८ या हेल्पलाईन क्रमांकावर पक्षांसंदर्भात फोन आल्यानंतर ही रुग्णावाहिका तातडीने त्या ठिकाणी पोहचून कबुतरांवर उपचार करत होती. बहुतांश फोन हे कबुतरखाना, जैन मंदिर तसेच कबुतरांचा जास्त वावर असलेल्या ठिकाणांहून आले होते. रुग्णालयामार्फत दिवसभरात तब्बल २५ कबुतरांवर उपचारा करण्यात आले. यातील १० ते १२ कबुतरे ही अधिक जखमी असल्याने व त्यांच्यावर रस्त्यावर उपचार करणे शक्य नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच एका घारीवरही उपचार करण्यात आल्याची माहिती दी बाई साकरबाई दिनशॉ पेटिट हॉस्पिटल फॉर अॅनिमलचे रुग्णालय मॅनेजर डॉ. मयुर डांगर यांनी दिली.
पक्षी व प्राणी जखमी झाल्यास त्यांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयातर्फे सकाळी ९ ते दुपारी ४ दरम्यान हेल्पलाईन क्रमांक ठेवण्यात आला आहे. ०२२२४१३७५१८ या हेल्पलाईन क्रमांकावर नागरिकांनी दूरध्वनी करावेत असे आवाहन डॉ. मयुर डांगर यांनी केले आहे. या क्रमांकावर नागरिकांनी फोन केल्यास त्यांना योग्य ती सेवा पुरवण्यात येईल, असेही डॉ. मयुर डांगर यांनी सांगितले.