Voice of Eastern

मुंबई : 

१८ वर्षांवरील बहुतांश नागरिकांना कोरोना प्रतिबंध लसीचा किमान पहिला डोस मिळाला आहे. आता १८ वर्षांखालील मुलांनाही लस देण्याचे नियोजन महापालिकेकडून करण्यात येत आहे. मुंबईमध्ये अंदाजित ३५ लाखांहून अधिक १८ वर्षांखालील मुले लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. या मुलांना लस मिळावी यासाठी पालिकेकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. मात्र अद्याप आयसीएमआरकडून लसीकरणाबाबत निर्देश आलेले नाहीत. सूचना मिळताच अल्पावधीत लसीकरण सुरु करण्यात येईल, असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बालकांच्या लसीकरणासंदर्भात करण्यात आलेल्या चाचणीचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत. हा अहवाल आल्यानंतर लसीकरणासंदर्भात आयसीएमआरकडून येणार्‍या निर्देशानुसार लसीकरणाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. आयसीएमआरच्या निर्देशांमध्ये लसीचा डोस किती असावा, लस साठवणूक केंद्रातील तापमान किती असावे? हे ठरवावे लागणार आहे. या सर्व सूचना आयसीएमआरकडून दिल्या जातील. त्यानुसार नियोजन करण्यात येईल असे पालिकेतील अधिकार्‍याकडून सांगण्यात आले. कांजूरमार्ग येथील पालिकेच्या लस साठवणूक केंद्रातील शीत कपाटात तापमान नियंत्रणाची सोय आहे. मुंबईतील १८ वर्षावरील ९२ लाख ३६ हजार नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. पालिकेने नायर रुग्णालयात २ ते १८ वर्षापर्यंतच्या १५ बालकांना प्रायोगिक तत्वावर कोेविड लस दिली आहे. त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. मुंबईमध्ये अंदाजित ३५ लाखांहून अधिक १८ वर्षाखालील मुले आहेत. मुंबईत सध्या खासगी आणि सार्वजनिक ४६७ लसीकरण केंद्र कार्यरत आहे. महानगर पालिकेने दिवसाला दोन लाख नागरीकांचा टप्पाही पूर्ण केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर आठवडाभराच्या आत लसीकरण सुरु करणे शक्य होणार आहे.

Related posts

डोंबिवलीपाठोपाठ पुणे, पिंपरीमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण

टीईटीची परीक्षा ३० ऑक्टोबरला होणार; आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी पुन्हा तारीख बदलली

Voice of Eastern

तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याचे बारावीच्या विद्यार्थ्यांना आवाहन; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या शुभेच्छा

Leave a Comment