Voice of Eastern
ताज्या बातम्यानोकरीमोठी बातमी

औरंगाबाद येथील महारोजगार मेळाव्यात ५ हजारपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी – कौशल्य विकास मंत्री

banner

मुंबई : 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या १७ व १८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यामध्ये ५ हजारपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विविध नामंकित कंपन्यांमध्ये आयटीआय, दहावी ते पदवीधर तसेच अभियांत्रिकी क्षेत्रात पदवी, पदविकाधारक उमेदवारांसाठी नोकरी, ऑन जॉब ट्रेनिंग तसेच अप्रेंटीशिपच्या संधी उपलब्ध असतील. रोजगार, अप्रेंटीशिप, स्वयंरोजगार इच्छूक उमेदवारांनी या महामेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

बजाज ऑटो, नवभारत फर्टीलायझर, अजंता फार्मा, एनआरबी बेअरिंग्स, अजित सीड्स, फोर्ब्स, धूत ट्रान्समिशन, इंड्युरंस टेक्नोलोजी, व्हॅराक इंजिनीअरींग, देवगिरी फोर्जींग्स, रुचा इंजिनिअर्स, श्री सेवा कॉम्प्युटर्स, परम स्किल्स, नील मेटल, मराठवाडा ऑटो कॉम्पो, पिट्टी इंजिनीयारिंग अशा विविध उद्योग कंपन्यांमधील रिक्त जागांसाठी या महामेळाव्यात भरती करण्यात येणार आहे, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेळाव्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मेळाव्यास मंत्री श्री. लोढा यांच्यासह केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त दीपेन्द्र सिंह कुशवाह यांच्यासह विविध उद्योजक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मेळाव्यामध्ये रोजगार भरतीसह ॲप्रेन्टीसशीप भरती मेळावा, व्यवसाय मार्गदर्शन, स्टार्टअप व कौशल्य प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), रेल्वे स्टेशन रोड, येथे दोन दिवस हा महामेळावा होईल.

नोकरी इच्छुक उमेदवार, विविध क्षेत्रातील नियोक्ता, उद्योजक यांची नोंदणी तसेच उपलब्ध रिक्तपदे यांची माहिती या मेळाव्यात अधिसूचित केली जाणार असून रिक्तपदांसाठी पात्र नोकरीइच्छूक, शिकाऊ प्रशिक्षण इच्छुक (अप्रेंटीशिप-On Job Training) उमेदवार व नियोक्त्यांना मेळाव्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आणले जाणार आहे. उद्योजक त्यांच्याकडील रिक्तपदाच्या अनुषंगाने उमेवारांच्या मुलाखती घेऊन योग्य उमेदवारास नोकरी, अप्रेंटीशिप (On Job Training) उपलब्ध करून देतील. याचबरोबर स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना माहिती व मार्गदर्शन करण्याकरीता स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणारी विविध महामंडळे, बँका, खाजगी वित्तीय संस्था व स्वयंरोजगाराच्या योजना राबविणारे केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागाचे प्रतिनिधी उपलब्ध असणार आहेत. मेळाव्यात नवउद्योजकांना चालना देण्यासाठी स्टार्टअप प्रदर्शन, युवकांसाठी करिअर काउन्सेलिंग, स्टार्टअपचे इनोव्हेशन सादरीकरण, कौशल्य प्रदर्शनही असणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधा

अधिक माहितीसाठी विभागाचे वेबपोर्टल https://rojgar.mahaswayam.gov.in ला भेट देवून रोजगार मेळाव्यासाठी सहभागी उद्योजक आणि त्यांचेकडील विविध रिक्त पदसंख्या यांची माहिती घेता येईल. तसेच, पात्र उमेदवारांना या रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. अधिक माहितीकरीता कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त सुरेश वराडे यांच्याशी ९८३४९४३७४२ या मोबाईल क्रमांकावर किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मालजीपुरा, स्टेशन रोड, औरंगाबाद, दुरध्वनी क्रमांक ०२४०-२९५४८५९ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts

नुबैरशाहने जिंकली सिल्वरलेक खुली बुद्धिबळ स्पर्धा

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत महत्वपूर्ण बदल

Voice of Eastern

मुंबईत फक्त ४११ विद्यार्थी शाळाबाह्य

Leave a Comment