मुंबई :
मौजमजेसाठी बाईकवर कर्कश आवाजातील सायलेन्सर लावणार्या बाईकस्वारांना वांद्रे वाहतूक पोलिसांनी चांगला दणका दिला आहे. गेल्या दोन महिन्यांत वाहतूक पोलिसांनी शंभरहून अधिक सायलेन्सर जप्त करुन त्याची बुलडोझरने विल्हेवाट लावली. वाहतूक पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.
गेल्या काही महिन्यांत काही बाईकस्वार विनाकारक कर्कश आवाजातील सायलेन्सर लावून नागरिकांची झोप मोड करीत होते. याबाबत काही तक्रारी वाहतूक पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्याची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत अशा बाईकस्वाराविरुद्ध धडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी वांद्रे, कार्टररोड, बॅण्डस्टॅण्टड बाईकवरुन जाताना कर्कश आवाजातील सायलेन्सर वाजवून विनाकारण त्रास देणार्या काही बाईकस्वारावर कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी बाईकवर लावलेले शंभरहून अधिक सायलेन्सर जप्त केले होते. बहुतांश चालकांनी बुलेट आणि पल्सर या बाईकचे मूळ लायसेन्सर बदलून दुसरे कर्कश आवाज देणारे सायलेन्सर लावले होते. त्यामुळे ध्वनी प्रदुषण वाढले होते. जप्त केलेले शंभरहून अधिक सायलेनसरवर शुक्रवारी वांद्रे वाहतूक पोलिसांनी बुलडोझर फिरविला. दुसरीकडे वाहतूक पोलिसांनी काही गॅरेजवाल्यांना सक्त ताकिद दिली असून यापुढे कोणत्याही बाईकला कर्कश आवाज देणारे सायलेन्सर लावू नये. तसा प्रकार उघडकीस आल्यास संबंधित गॅरेजवाल्याविरुद्ध कारवाईचे संकेत पोलिसाकडून देण्यात आले आहे.